

मुंबई : ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह हा वाहतूक कोंडीतून होणारा 40 मिनिटांचा प्रवास आता केवळ 5 मिनिटांवर येणार असून, डिसेंबर 2028पर्यंत या भागात दुहेरी बोगदा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्पासाठीचे टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बटन दाबताच मुंबईच्या भुगर्भात शिरले आणि बोगदा खोदण्यास सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
हा भुयारी मार्ग एकूण 9 किमी आहे. दक्षिण मुंबईतील एकूण 700 मालमत्तांच्या खालून हे दुहेरी बोगदे जातील. त्यात काही ऐतिहासिक इमारतींचाही समावेश आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि मेट्रो 3 भुयारी मार्गिका यांच्यापासून काही मीटर खोलवर या बोगद्यांची निर्मिती करण्यात येत आहे. प्रत्येक बोगद्यात 3.2 किमीचे आपत्कालीन रस्ते आणि 1 आपत्कालीन मार्गिका असेल. दोन्ही बोगदे सुरक्षेच्या दृष्टीने दर 300 मीटर अंतरावर एकमेकांशी जोडले जातील. हा प्रकल्प सागरी किनारा मार्ग व अटल सेतूला जोडला जाईल.
पूर्व द्रुतगती महामार्गावरून सुसाट जाणारी वाहने डीमेलो रोडवर उतरताच मंदावतात आणि ऑरेंज गेटपासून त्यांची गोगलगाय होते. तेथून पुढे कोंडीतून वाट काढत मरिन ड्राइव्हला जाण्यासाठी आज साधारण 40 मिनिटे लागतात. कोंडी नसेल तर 20 ते 25 मिनिटे लागतात. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह दुहेरी बोगद्यांमुळे मात्र हाच प्रवास 5 मिनिटांत होईल.
चालकांचे हजारो तास वाचतील - उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह या भागात उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या भागातील जागेची कमतरता आणि न थांबवता येणारी वाहतूक यांमुळे उड्डाणपूल उभारणे शक्य नाही. त्यामुळे दुहेरी बोगदा प्रकल्पाची आखणी करण्यात आली. हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामुळे वाहतुकीचे विकेंद्रीकरण होईल. परिणामी, हजारो वाहनचालकांचे हजारो तास वाचतील.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री