Shaktipeeth Highway
मुंबई : शक्तिपीठ महामार्गाविरोधात काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी (दि.१ जुलै) विधान परिषदेत भूमिका मांडली. राज्यात गरज नसलेला हा महामार्ग असून सरकारने तो रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका. याबाबत सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी, असेही ते म्हणाले.
''शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. वर्धा, परभणी पासून ते कोल्हापूर पर्यंत हा महामार्गा कसा चुकीचा आहे? यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. रत्नागिरी- नागपूर महामार्गावर २५ टक्के वाहतूक आहे. असे असताना सरकारचा नव्या महामार्गासाठी आग्रह का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा नवा महामार्ग कोणत्या कंत्राटदारासाठी? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला असल्याचेही ते म्हणाले.
वित्त खात्याचाही या प्रकल्पावर आक्षेप आहे. या महामार्गाला ज्यावेळी सुरुवात झाली; त्यावेळी सर्वपक्षीय आमदारांनी हा महामार्ग नको, अशी भूमिका घेतली. नंतर भूमिका बदलत गेल्या, असाही टोला त्यांनी लगावला.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यांतील शेतकरी रस्त्यावर उतरलेत. आज कृषी दिन असून या दिवशी शेतकऱ्यांना शेती वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
नवीन पीक योजनेच्या माध्यमातून सरकार ५ वर्षात २५ हजार कोटी शेतकऱ्यांना देणार असल्याचा सरकार दावा करत आहे. मात्र यासाठी काही टाईमलाईन आहे? ते पैसे किती दिवसात आपण शेतकऱ्यांना देणार आहात? तसेच १ रुपयात विमा या योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघडकीस आला, यामध्ये गुंतलेल्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्नही सतेज पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला.
याला उत्तर देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या नवीन पीक योजनेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी रुपये वाचलेत. तेच पैसे शेतकऱ्याच्या भांडवली गुंतवणुकीला वापरणार असल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच पंचनामा झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत त्याचा मोबदला मिळेल असेही त्यांनी सांगितले. विमा कंपन्याच्या बाबतीत जर कोणी तक्रार केली आणि त्यात विमा कंपनी दोषी सापडली तर त्यांच्यावर महिन्याच्या आत कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवारी (दि. १) कोल्हापूर येथे पुणे-बंगळूर महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.