

Pune Bangalore Highway Closed Kolhapur News
कोल्हापूर : शेतकर्यांचा प्रचंड विरोध असलेल्या शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने आज (दि. १) कृषिदिनी सकाळी ११ वाजता शिरोली येथील पंचगंगा पुलावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी काही आक्रमक शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न केला. एकीकडे महामार्ग रोको आंदोलन सुरू असले तरी दुसरीकडे काही आक्रमक शेतकऱ्यांनी आपण आत्महत्या करणार असे म्हणत नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती कमी आहे. त्यामुळे काही शेतकरी भूमीहीन होणार आहेत. मग आम्हाला जगून काय अर्थ आहे? असे म्हणत या सगळ्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि या सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, आंदोलनस्थळी येण्यासाठी शेतकऱ्यांना पोलिसांकडून अडविले जात आहे. परंतु, ज्या ठिकाणी अडविले जाईल, त्याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.
काँग्रेस आमदार सतेज पाटील म्हणाले की, राज्यातील बारा जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत आहे. गरज नसताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारला जात आहे. याप्रश्नी आपण पावसाळी अधिवेशनाता प्रश्न मांडू. या महामार्गाचा फेरविचार करावा, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली.
स्वाभिमानीचे शेतकरी नेते राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे यांच्यासह अनेक नेते आणि शेतकरी महामार्गावरती बसून आंदोलन करत आहेत. शक्तीपीठ महामार्ग आम्ही कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. जर हा महामार्ग करण्याचा प्रयत्न केला. तर रक्ताचे पाट वाहिले तरी चालतील. मात्र, हा महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी, विजय देवणे यांनी दिला.
दरम्यान, या महामार्गासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकर्यांची लाखो हेक्टर जमीन जाणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद कऱण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज कृषी दिनी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात कृती समितीसह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत.