

Shaktipith Mahamarg Farmer Protest
पूर्णा : राज्य शासनाने कडक पोलिस बंदोबस्तात होवू घातलेल्या महत्वकांक्षी व बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग रस्ता प्रकल्पाकरीता नुकतीच अधिकृत मान्यता दिली आहे. सदरील शक्तिपीठ महामार्ग हा पूर्णा तालूक्यातून जाणार असून त्यात आहेरवाडी, सुरवाडी, पिंपळगाव बाळापूर, नावकी, संदलापूर, कात्नेश्वर गाव शिवाराचा समावेश आहे. या गावातील एकूण १६९ शेत गटातून हा महामार्ग जाणार आहे.
त्यासाठी सुमारे १९० एकर जमीन अधोरेखित होवून ती रस्त्यात बाधीत होत तीची आता १ जुलै नंतर मोजणी व भुसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून संयुक्तरीत्या राबवली जाणार आहे. सहा गावातून जाणारा महामार्ग ९ ते १० किमी लांबीचा असणार आहे. त्यामुळे या महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे अशांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे पहावयास मिळत आहे. जमीन मोजणी भुसंपादन करुन ताब्यात घेण्याची जोरदार चर्चा चालू झाली असल्याने जमिनीच्या माध्यमातून आपल्या जन्माची भाकर हिरावून घेतली जाणारच, या चिंतेत शेतकऱ्यांनी आता भाकर खाणेच सोडून दिले आहे.
सरकार जरी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह बंदोबस्तात जमिनीची मोजणी भुसंपादन करणार असलेतरी त्या क्षणी जीव गेला तरी बेहत्तर परंतू महामार्गात जाणाऱ्या जमिनीची मोजणीची मात्र कदापी होवू देणार नाही, असा पवित्रा सबंधीत शेतकऱ्यांना घेतला असल्याचे शेतकरी नेते गोविंदराव घाटोळ यांनी सांगितले. आधीच समृध्दी महामार्गात या गाव शिवाराची जमीन गेल्यामुळे शेतकरी हैराण असताना शक्तिपीठ महामार्ग संकटाची त्यात भर पडली आहे.
सदर महामार्ग मोजणी काम हे ठिकठिकाणी शेतकरी उधळून लावत आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांना पिटाळून लावले जात आहे. असाच प्रकार पूर्णेतील सहा गाव शिवारात देखील होणार आहे. जिवाचे काही झाले तरी चालेल पण जमीन देणार नाहीत, असी वज्रमूठ शेतकरी आवळत आहेत. शासन मावेजा जरी देणार असला तरी तो आमच्या जन्माला पुरणार नाही. आमची जमीन आम्हाला पिढ्यान् पिढ्या जगवत आहे. असे शेतकरी सांगत आहेत.