Sukhed Khandala Murder: Pudhari
मुंबई

Sukhed Khandala Murder: साताऱ्यात गळा आवळून खून; मृतदेह जाळून विहिरीत फेकला, नवी मुंबईच्या पोलिसाकडून अनैतिक संबंधातून खून

अफेअरच्या संशयातून कट; सीसीटीव्हीच्या आधारे उलगडा, चौघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सुखेड (ता. खंडाळा) येथे एकाचा गळा आवळून खून करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याच्या समोर आलेल्या घटनेला अखेर वाचा फुटली आहे. यामध्ये मुख्य संशयित आरोपी नवी मुंबई पोलिस असल्याचे समोर आले आले आहे. मैत्रिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून निर्घृण खून करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे या खुनाच्या घटनेला वाचा फुटली असून चौघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

बंडू बापू भिसे (49, सध्या रा. कळंबोली, जि. रायगड, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (36, रा. साखरवाडी, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (27, रा. होळ, ता. फलटण, सध्या रा. पुणे), श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (25, रा. अंबड जि. जालना सध्या रा. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील बंडू भिसे हा पोलिस असून सोमनाथ खंडू बोबडे (30, रा. कळंबोली, रायगड) असे खून झालेल्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुखेड गावच्या हद्दीत चोपडे वस्तीजवळील विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुष असलेला मृतदेह आढळून आला. तो मृतदेह अर्धवट जाळून त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता घातपात झाला असल्याबाबत प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द अज्ञाताचा खून केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व लोणंद पोलिस ठाण्याच्या पोलिसांची पथके तयार करण्यात आली. पोलिसांच्या एका पथकाने सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यांना एक संशयित कार निष्पन्न झाली. पोलिसांनी 3 दिवस अहोरात्र परिश्रम घेवून कारची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास वेगाने केला असता खूनाचा थरार समोर आला. कळंबोली येथून संशयित आरोपी बंडू भिसे या मुंबई पोलिसाला ताब्यात घेतले. सातारा पोलिसांनी त्या संशयिताकडे तपास केला असता त्याने खूनाची कबूली दिली. मैत्रीणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्याने इतर तीन साथीदारांना सोबत घेतले. सोमनाथ बोबडे यांना संशयितांनी कळंबोली येथून होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने घेतले.

सोमनाथ बोबडे याचे दोरीने त्याचे हातपाय बांधून दुसऱ्या दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह त्याच होंडा सिटी कार क्रमांक एमएच 12 डीवाय 8846 यामधून सुखेड ता. खंडाळा येथे आणला. तेथे मृतदेहावर संशयितांनी पेट्रोल टाकून पेटवून मृतदेह विहीरीमध्ये ढकलून देवून खूनाचा पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केला, अशी कबूली संशयित आरोपीने दिली. मुख्य संशयित आरोपीने दिलेल्या या कुबलीनंतर संशयित इतर आरोपींची धरपकड करुन त्यांना अटक केली.

अफेअरच्या संशयातून खून

संशयित मुंबई पोलिसाला त्याच्या अफेअर असलेल्या मैत्रिणीवर गेल्या काही दिवसांपासून संशय आला होता. त्याने पाळत ठेवल्याने मैत्रिणीसोबत सोमनाथ बोबडे याचे संबंध असल्याची शंका अधिक बळावली. यातून संतापाच्या भरात त्याने कट रचून हा खून केल्याचे सातारच्या पोलिस तपासात समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT