Tushar Doshi Transferred Pudhari
मुंबई

Tushar Doshi Transferred: तुषार दोशी यांची बदली; सातारची झेडपी झटापट नडली

राज्य सरकारने सोमवारी नऊ पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून दोशी यांची नियुक्ती सांगली पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्यामुळे वादात अडकलेले सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने सोमवारी नऊ पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून दोशी यांची नियुक्ती सांगली पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी मोठा राडा झाला. पोलिसांकडूनच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला. यानंतर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशींच्या निलंबनाचे निर्देशही दिले होते.

अखेर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी निर्देशांवर स्थगिती देत निर्णय राखून ठेवला. त्यानंतर, तुषार दोशी हे काही दिवस रजेवर गेले होते. रजेवरुन पुन्हा हजर झाल्यानंतर तुषार दोशी यांची बदली झाली.

तुषार दोशी यांची सातारा पोलिस अधीक्षक पदावरून बदली करून त्यांची नियुक्ती सांगली पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. तर, साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी पुणे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची पोलीस उपआयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पदावर बदली करण्यात आली.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांची बदली पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्रात करण्यात आली. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. तर, गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांना गडचिरोली पोलिस अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे पदावर बदली करण्यात आली आहे. तर, धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या पोलिस अधीक्षक पदी बदली करण्यात आली. तर, पुणे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT