

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार येत्या 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे व निकष ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची खूशखबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील 136.28 लाख शेतकऱ्यांचे 105.88 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानापोटी शेतकऱ्यांना शासनाने 20,196 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही 2 लाख 15 हजार हेक्टर नुकसान झाले. त्यातील बाधित शेतकऱ्यांना भरपाईचे शासन निर्णय निघाले आहेत. मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरु असल्याचेही कृषीमंत्री भरणे म्हणाले.
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे राज्यात हवामान प्रतिरोधक बियाण्यांचा वापर, उताराला आडवी पेरणी, बीबीएफ तंत्राचा अवलंब, शेततळ्यांची निर्मिती, मल्चिंग व सेंद्रिय खतांचा वापर तसेच पाणी बचत करणाऱ्या सिंचन पद्धतींवर विशेष भर दिला जाणार आहे, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.