Sanjay Raut Press Conference:
प्रकृतीच्या कारणांमुळे गेल्या दीड महिन्यापासून माध्यमांपासून दूर असलेले शिवसेनेचे खासदार अखेर परतणार आहे. शिवसेनेची धडाडणारी तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. याबाबतची माहिती पुढारी न्यूजचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिली.
संदीप राजगोळकर म्हणाले की, 'संजय राऊत हे पुन्हा माध्यमांशी संवाद साधणार आहेत ही शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी मोठी बातमी आहे. कारण २०१९ मध्ये जेव्हापासून महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. तेव्हापासून संजय राऊत हे सकाळी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर कडाडून टीका करत होते.
मात्र गेल्या काही आठवड्यांपासून प्रकृतीच्या कारणांमुळे संजय राऊत हे या सकाळच्या पत्रकार परिषदेपासून दूर होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता हे उपचार संपत आल्याची माहिती मिळत आहे. जरी संजय राऊत यांनी या काळात माध्यमांसमोर येऊन संवाद साधला नसला तरी ते 'सामना'च्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडत होते.
प्रामुख्यानं बिहार निवडणूक असेल किंवा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली. या कालावधीत संजय राऊत यांची भूमिका महत्वाची होती. आता ते सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना नेमकी कोणती भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्याच्या घडीला शिवसेना आणि मनसे यांच्यात युतीबाबत खलबतं सुरू आहेत. त्यात देखील संजय राऊत यांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे जरी शिवसेनेत असले तरी त्यांचे राज ठाकरे यांच्याशी निकटचे संबंध आहेत.