

Cyclone Ditwah Havey Rain:
ऐन थंडीच्या हंगामात भारतातील अनेक राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. नुकतेच सेन्यार (Senyar) चक्रीवादळामुळं दक्षिण भारतातील अनेक राज्यांमधील वातावरण बिघडलं होतं. त्यातच आता अजून एक चक्रीवादळ दित्वा (Ditwah) सक्रीय झालं आहे.
त्यामुळे दक्षिण भारतातील किनाऱ्यावरील राज्यांमधील हवामान बिघडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे गुरूवारी चक्रीवादळात रूपांतर झालं. त्याला Ditwah हे नाव देण्यात आलं आहे.
हा संभाव्य धोका पाहता हवामान खात्यानं प्री सायक्लॉन अलर्ट दिला आहे. या चक्रीवादळाचा रोख हा उत्तर तमिळनाडू, पदुच्चेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी भागांकडे असणार आहे. या भागात ३० नोव्हेंबरपर्यंत हवामान एकदम खराब होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान तमिळनाडूत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर २८ आणि २९ नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अनके जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसंच दक्षिण आंध्र प्रदेश आणि रायलसीमी भागात २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच केरळमध्ये दखील २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेलंगणात देखील ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला पाऊस पडू शकतो. तसेच दक्षिण कर्नाटकमध्ये २९ नोव्हेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटक आणि अंदमान निकोबार इथं विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. अंदमानमध्ये २७ ते २९ नोव्हेंबर रोजी ३० ते ५० किलोमीटर वेगानं वारे वाहतील.
हवामान विभागानुसार सेन्यारचा प्रभाव कमी होत आहे मात्र दित्वा वादळ तीव्र होत आहे. याचा संयुक्तरित्या मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.