sanjay raut target amit shah supreme court
"मी आत्ता एक 'एक्स'वर पोस्ट केली आहे. आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. काल (शनिवारी) सह्याद्री विश्रामगृहावर राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. साहेब, आमचे आमदार आणि मंत्री फार घाबरले अन् अस्वस्थ आहेत; सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागेल याबाबत आमच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या मनामध्ये अस्वस्थता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर त्यांच्या साहेबांनी 'मी सर्व पाहून घेईन', असे आश्वासन दिले आहे. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात निकाल आधीच सेट केला आहे का?" असा सवाल करत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज (दि.३०) माध्यमांशी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, "गेल्या महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी गटाच्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेऊन न्यायालयाच्या संभाव्य निकालाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावर अमित शहा यांनी 'सब सेट हो जाएगा, उसकी चिंता मत करो, मेरे पे छोडो' असे आश्वासन दिल्याचे समोर आले आहे. तसेच, काल मुंबईत अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीत शिंदे यांनी 'आपले मंत्री व आमदार अस्वस्थ आणि घाबरलेले आहेत' असे सांगितल्यावर, शहा यांनी पुन्हा 'मेरी पार्टी है, मेरी चिंता है, सब सेट हो गया है' असे विधान केल्याचा दावाही राऊतांनी केला. राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्वजण आधीच एकाच सुरात निकालाबाबत वक्तव्ये करत असल्याचेही त्यांनी सांगितले."
"न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून अधर्माच्या बाजूने सर्वोच्च न्यायालय जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आसनामागे ‘यतो धर्मस्ततो जयः’ (जिथे धर्म आहे तिथे विजय आहे) हे बोधवाक्य लिहिलेले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा पाय कितीही खोलात गेला तरी शेवटी सत्याचाच विजय होईल," असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील बिल्डर आणि उद्योगपतींची जास्त माहिती असते. फडणवीस हे सर्वसामान्य जनतेचे नसून केवळ उद्योगपती आणि बिल्डरांचे नेते आहेत. त्यामुळे कोणता बिल्डर संकटात आहे, हे त्यांनाच उत्तम ठाऊक असेल," असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यू यॉर्कमध्ये जाऊन "मुसलमानांचा द्वेष करणारा हिंदू असू शकत नाही" असे विधान केले. या विधानाचा समाचार घेताना, "भागवतांनी हे विधान अमेरिकेत न करता भारतात, दिल्लीत आणि नागपुरात करायला हवे," असे सांगत "भारतात विद्वेषाचे राजकारण करणाऱ्यांच्या पाठीशी संघ उभा राहणार नाही आणि संघस्वयंसेवक सरकारमध्ये असले तरी त्यांना सत्तेतून बाहेर काढू, अशी स्पष्ट भूमिका भागवतांनी भारतात घेऊन दाखवावी. हिंदू धर्मात ढोंगाला स्थान नाही, त्यामुळे सरसंघचालकांनी भारतात एक आणि परदेशात दुसरे अशी दुटप्पेपणाची भूमिका घेऊ नये," असेही राऊत म्हणाले.
"शरद पवार हे या देशाच्या राजकारणातील टोलेजंग व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी राजकारणात अनेक टॉवर उभे केले आणि पाडले. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाताखाली काम करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजित पवारांनंतर हा विषय संपला असून, पक्षातील स्वाभिमानी नेते योग्य तो निर्णय घेतील; दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण कोणत्याही परिस्थितीत होणार नाही," असा दावाही संजय राऊत यांनी केला.
"काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या मंचावरून भाषण केले, त्या मंचाचे भाजप कार्यकर्त्यांनी 'शुद्धीकरण' केले. हा दलितांचा आणि एका ज्येष्ठ नेत्याचा थेट अपमान असून, अशा प्रकारे जातीयता पसरवणाऱ्या आणि शुद्धीकरण करणाऱ्या भाजप नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर तत्काळ ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) दाखल करून त्यांना अटक करावी," अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.