Sanjay Raut On Ajit Pawar Controversial Statement :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मराठवाडा पूर पाहणी दौरा केला. यानंतर आज (दि २६) पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान, त्यांना अजित पवार यांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देखील विचारण्यात आलं. त्यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
संजय राऊत यांना आजच्या पत्रकार परिषदेवेळी अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी, 'अजित पवारांची ही स्टाईल नसून मग्रुरी आहे. मराठवाड्याचं दुःख त्यांना कळलं नाही. फडणवीस यांनी देखील राजकारण करू नको असं सुनावलं होतं. आम्हालाही असे प्रश्न विचारले. आम्ही मात्र अशी उत्तर दिली नाहीत.
संजय राऊत पुढे म्हणाले, ' तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीचेच आहात. तुम्ही भ्रष्ट राज्यकर्ते आहात. ठाण्याचे उपमुख्यमंत्री स्वतःचे फोटो छापून मदत करत आहेत. पंजाबचं उदाहरण पाहा. भगवंत मान यांनी तब्येत बरी नसताना देखील काम करत आहेत. त्यांनी हेक्टरी ५० हजार मदत जाहीर केली आहे.'
दरम्यान, संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील शाब्दिक हल्ला चढवला. ओला दुष्काळाबाबत ते म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे पेशवे कालातील नाना फडणवीस यांच्यासारखं वागत आहेत. ते म्हणातात की ओला दुष्काळ हा शब्द शब्दकोशात नाही. तिकडं मात्र पुरानं शेतकरी हवालदिल आहेत.
आम्ही लातूरमध्ये होतो त्यावेळी काँग्रेसचे तिथले दोन्ही आमदार आमच्या सोबत होते. त्यावेळी देखील ओल्या दुष्काळाचा विषय निघाला. यावर अमित देशमुख म्हणाले लोकभावना असेल तर मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा. जरी तो शब्द शासकीय भाषेत नसला तरी ओला दुष्काळ जाहीर करावा.'
याचबरोबर संजय राऊत यांनी तानाजी सावंत यांच्यावर देखील टीका केली. त्यांच्या मतदार संघात शिवसेनेचे कार्यकर्ते मदत घेऊन गेले. तिथं शासनाची मदतच पोहचलेली नाही. राऊतांनी तानाजी सावंत यांना मतदार संघ पाण्यात तानाजी पुण्यात... असा टोला देखील हाणला.
राऊत यांनी येत्या ११ ऑक्टोबरला विषयावर मराठवाड्यात प्रचंड मोर्चा काढणार असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करणार आहेत असं सांगितलं. यापूर्वी ११ ऑक्टोबरल मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थिती ते शक्य नाही. म्हणून सर्व शेतकरी एकत्र येऊन एक मोर्चा काढावा असं ठरलं. असं राऊत यांनी सांगितलं.