

Rahul Gandhi Calls Congress Worker :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मॉर्फ केलेला फोटो व्हायरल केल्याच्या आरोपावरून डोंबिवली येथील काँग्रेसचे पदाधिकारी मामा पगारे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा गंभीर प्रकार घडला होता. या घटनेनंतर मामा पगारे यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच, संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वतः मामा पगारे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत ही घटना राहुल गांधी यांच्या कानावर घालण्यात आली.
राहुल गांधी यांनी मामा पगारे यांना धीर देत, त्यांना लढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी पगारे यांना सांगितले की, 'मामा घाबरू नका संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे. अन्यायाविरूद्ध तुम्ही लढत रहा आम्ही तुमच्यासोबत आहोत.'
पगारे यांना झालेल्या अपमानानंतर पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.