ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. pudhari photo.
मुंबई

Sanjay Raut | "तुम्ही तर इस्लामाबाद ताब्यात घेणार होता.." : इराण-अमेरिका युद्धविरामावर संजय राऊत नेमकं काय म्‍हणाले?

युद्धविरामासंदर्भातील बैठक इस्लामाबादमध्ये होणे ही केंद्र सरकारला चपराक

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Iran-US ceasefire

मुंबई: "अमेरिका आणि इराणमधील हे युद्ध संपूर्ण जगाचा विध्वंस करेल असे होते. आता युद्धविरामाचे श्रेय पाकिस्तानला जात आहे. हे श्रेय 'विश्वगुरूंना' मिळायला हवे होते; पण महाविश्वगुरु केरळमध्ये तोंडातले बॉम्ब टाकत होते. आता युद्धविरामाची शांती बैठक इस्लामाबादमध्ये होणार आहे. ही भारत सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असतील, तर ही भारत सरकारला चपराक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही," अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. ८) माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला.

बलिदान कसे करावे हे इराणने जगाला दाखवून दिले

इराणसारखा देश इस्रायलसोबतच अमेरिकेसारख्या महाशक्तीसमोर शरण गेला नाही. ३८ दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांनी झुंज दिली. देशासाठी कसे लढावे, बलिदान कसे करावे, हे इराणने जगाला दाखवून दिले. इराणचे नुकसान झालेच, त्यासोबत इस्रायलचे आणि ट्रम्पसारख्या राष्ट्राध्यक्षांचेही नुकसान झाले आहे, असेही राऊत म्हणाले.

ते टेलिफोन ऑपरेटरसारखे काम करत होते

अमेरिका आणि इराण युद्धविरामाचे श्रेय पाकिस्तानला जात आहे. शांती बैठक इस्लामाबादमध्ये होणार आहे, ही भारतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आज भारताची परिस्थिती 'डरपोक उंदरासारखी' झाली आहे. ते फक्त फोनवर बोलत होते; ते टेलिफोन ऑपरेटरसारखे काम करत होते. "आम्ही दलाल राष्ट्र नाही," असे परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखले. जयशंकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. "तुम्ही तर इस्लामाबाद ताब्यात घेणार होता, तिथे भाजपचा झेंडा फडकावणार होता," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पार्थ पवारांनी अजित पवार यांचा इतिहास पाहिला पाहिजे

"पार्थ पवार यांनी अजित पवार यांचा इतिहास पाहिला पाहिजे. शरद पवार यांचा इतिहास काँग्रेसचा आहे. काँग्रेसवर अशा प्रकारे टीका कोणी करावी?" असेही राऊत म्हणाले.

अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही?

"उद्धव ठाकरे हे मनाचे मोठे नेते आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसने आता अशी भूमिका घेतली आहे की, अजित पवारांच्या बाबतीत चौकशी केली, तर आम्ही आमची भूमिका मागे घेऊ. तसेच, जो अपघात झाला आहे, त्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा (FIR) का दाखल केला नाही? त्यांनी तातडीने एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे," असेही संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगालमधील मुस्लिम हे अधिकृत नागरिक

"पश्चिम बंगालमधील मुस्लिम हे अधिकृत नागरिक आहेत. त्यांचे मतदान कापले गेले आहे. ते पिढ्यानपिढ्या देशाचे नागरिक आहेत. अशा प्रकारे तुम्ही ममता यांचा पराभव करणार? तुम्ही अशाच प्रकारे आमचाही पराभव घडवून आणला," असा आरोपही राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT