Sanjay Raut Slams CM Devendra Fadnavis over Law and Order and Women Safety
मुंबई : महिला व मुलींवर अत्याचार होण्याची घटना पहिली नाही. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचार, हत्या आणि कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी जी कर्तव्ये पार पाडायला पाहिजेत, ती पार पाडली जात नाहीत. आमचे मुख्यमंत्री टिवल्या-बावल्या करत इकडे-तिकडे किंवा कधी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला, कधी केरळमध्ये, कधी आसाममध्ये तर कधी तामिळनाडूमध्ये प्रचाराला जातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २४ तास केवळ राजकारणात आणि इतर राज्यांच्या प्रचारात अडकलेले आहेत," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.
नुकत्याच घडलेल्या भोर येथील घटनेचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, "मिसिंग लिंक रस्त्याच्या उद्घाटनावेळी ट्रॅफिक जाम झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागितली. जर ट्रॅफिकसाठी माफी मागता येते, तर चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येबद्दल त्यांनी माफी का मागितली नाही? या अपयशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जनतेची माफी मागायला हवी."
"हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेले नाही. केवळ पैशाचा माज आणि सत्तेच्या मस्तीवर हे सरकार चालले आहे. चार वर्षांच्या मुलीवर नराधम अत्याचार करतात, कारण त्यांना कायद्याची भीती नाही. अशा परिस्थितीत आता राज्यातील माता-भगिनींनी आणि विरोधी पक्षांनी या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून बंड पुकारले पाहिजे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तुम्ही ग्रामस्थांवर, जनतेवर लाठीचार्ज केला, पण तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. तुमचा कायद्याचा धाक तुम्ही सामान्य जनतेला दाखवताय. ज्यांच्यावर तुम्ही लाठीमार केला त्या जनतेचा काय दोष आहे? ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावर उतरले कारण सरकार नालायक आहे. आंदोलन केले त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. ग्रामस्थांनी सुद्धा असे म्हटले की, त्या आरोपीला आमच्या हवाली करा किंवा त्याला तात्काळ फाशी द्या. खरं तर या सरकारलाच जनतेने ताब्यात घेतले पाहिजे. या प्रकरणात खरं तर सरकार आणि पोलीस हेच 'आरोपी' आहेत. पोलीस दलाचा वापर केवळ राजकीय सुरक्षेसाठी केला जात असून, या नालायक सरकारवरच खटला भरला पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.
खासदार संजय बंडू जाधव यांच्या नाराजीच्या चर्चेवर बोलताना राऊत म्हणाले, "बंडू जाधव हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी जर काही विधान केले असेल, तर त्यामागची त्यांची भावना काय आहे, हे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून समजून घेऊ. पण सध्याच्या राजकारणात अर्थकारणाचा जो प्रभाव वाढला आहे, त्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले दुःख योग्यच आहे."
मध्यंतरी दिल्लीमध्ये माझ्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली, तेव्हा अनेक खासदारांचे म्हणणे पडले की, 'आम्ही कष्ट करतो, पण शेवटी ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो, त्यात मतदार वाहून जातात.' विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणताही निधी दिला जात नाही, विकासकामे केली जात नाहीत, हे सर्वच खासदारांचे दुःख आहे. हे दुःख माझ्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे बंडू जाधव यांनी व्यक्त केले, इतर काही खासदारांनी व्यक्त केले. हे सुद्धा लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत, याचे भान प्रधानमंत्री मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले पाहिजे. जे आमच्या पक्षातून निवडून आले नाहीत त्यांना विकासाचा निधी द्यायचा नाही, हा राज्याच्या जनतेवर आणि त्या लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांवर केलेला अन्याय आहे, असेही संजय राउत म्हणाले.
जेव्हा एकनाथ शिंदे ५०-५० कोटी रुपये निवडणुकीला देतात, भारतीय जनता पक्ष १०० कोटी खर्च करते, हा लुटलेला पैसा आहे जनतेचा. तो आम्ही लुटून, दरोडे टाकून द्यायचा का? भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे बजेट १० ते १५ हजार कोटींचे असते, एकनाथ शिंदेंचे त्यापेक्षा जास्त असते महाराष्ट्रात. मग हे पैसे येतात कुठून? याचा कोणी विचार करतोय का? याचा विचार खासदाराने सुद्धा केला पाहिजे. चोरीच्या पैशातून, लुटीच्या पैशातून निवडणुका लढायच्या का? आणि ही लूट करण्यासाठी मग काय पक्षाच्या प्रमुखांनी खांद्यावर कुऱ्हाड टाकून जंगलात लुटीला जायचे का? हा आमच्यासारख्या माणसाला पडलेला प्रश्न आहे.", असेही त्यांनी नमूद केले.