Sanjay Raut Slams BJP Shinde Sena Spokespersons: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप अन् शिवसेना शिंदे गटांच्या नेत्यांवर आज टीकास्त्र सोडलं. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाल्यावर भाजप नेते अन् शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. आजच्या (दि. २५ डिसेंबर) पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जर ठाकरे बंधूच्या युतीने काही फरक पडणार नसेल तर मग इतके प्रवक्ते घेऊन त्याच्यावर भाष्य का करता असा सवाल केला.
संजय राऊत भाजप अन् शिंदे गटाच्या टीकेवर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, 'ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवता कशाला. सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा घेऊन युती कशी अमुक आहे.. तमुक आहे.. वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू.'
राऊत पुढे म्हणाले की, ठाकरे एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या फौजांना कामाला लागावे लागले आहे. मुंबई महाराष्ट्रात राहिली ती ठाकरेंच्या संघर्षामुळेच, नाहीतर भाजपने मुंबईचे तुकडे पाडून अदानींच्या घशात घातली असती.
संजय राऊत भाजपच्या मराठी प्रेमावर बोलताना म्हणाले, 'भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केले? गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद सोडला तर एकाही भाजप नेत्याने सीमाप्रश्न किंवा अखंड महाराष्ट्रासाठी आवाज उठवला नाही, उलट महाराष्ट्र तोडून 'वेगळा विदर्भ' करण्याची भाषा बावनकुळे करत आहेत.'
एकनाथ शिंदे यांच्या 'मुलं पळवणारी टोळी' या विधानाचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, ज्यांनी स्वतःचा पक्ष आणि बाप चोरला आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये. भाजपने कुत्रे पकडण्यासारखे पिंजरे लावले आहेत, त्यात शिंदे गटाची किती माणसं अडकतात हे महापालिकेनंतर दिसेल.
"स्वातंत्र्य लढ्यात तुमचे वैचारिक पूर्वज कुठे होते?" असा सवाल करत राऊत यांनी फडणवीसांना लक्ष केले. मुस्लीम क्रांतिकारकांनी फासावर जाताना वंदे मातरम म्हटले, पण भाजपला राजकीय गरजेपोटी आता या शब्दाची आठवण झाली आहे. राऊत यांनी काँग्रेसबोतच्या जागा वाटपाबाबत देखील भाष्य केलं.
ते म्हणाले, वर्षा गायकवाड आणि काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. मुंबईतील जागावाटप 'जिंकून येण्याच्या क्षमतेवर' (Electability) ठरेल. कुणीही जागा अडवून धरू नये.
पंतप्रधान ख्रिसमसनिमित्त चर्चमध्ये जातात आणि तिकडे त्यांचेच लोक युपीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालतात, हा कोणता दुटप्पीपणा आहे? असा सवाल संजय राऊत त्यांनी उपस्थित केला.