

Sanjay Raut Raj Thackeray Video: शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. या घोषणेच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष स्थान होतं.
ते संपूर्ण पत्रकार परिषद या ठाकरे बंधूंच्या सोबत स्टेजवर बसले होते. पत्रकार परिषद देखील त्यांनीच सुरू केली. मात्र ज्यावेळी पत्रकार परिषद संपली त्यानंतर ते हळूच खाली जात होते. मात्र राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबत जे केलं ते पाहून ठाकरे कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्यातील जिव्हाळा दिसून येतो.
मुंबई महानगर पालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर ठाकरे बंधूंनी आपली पत्रकार परिषद ही आवरती घेतली. त्यानंतर कौटुंबिक फोटो सेशन सुरू होणार होता. त्यामुळं स्टेजवरील संजय राऊत हे हळूच खाली उतरून जात होते. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संजय राऊत यांच्या हाताला धरून त्यांना उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मध्ये उभा केले. जणू या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे संजय राऊतच शिल्पकार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगत होतं.
संजय राऊत देखील या स्नेहामुळं अन् दिलेल्या आदरयुक्त स्थानामुळं आनंदी झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी जरी आजच्या पत्रकार परिषदेची सुरूवात केली असली तरी त्यांनी पहिल्यांदाज आज मी काही बोलणार नाही असं स्पष्ट सांगितलं. तरी त्यांनी आजचा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलष आणून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आजही एसाच ऐतिहासिक ऐक्याचा मंगल कलश घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. या महाराष्ट्राचे फक्त ठाकरेच नेतृत्व करू शकतात असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवलं.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी संजय राऊत यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. ते जसे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अन् बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. तसेच ते राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मित्र देखील आहेत.
ज्यावेळी संजय राऊत आजारी होते त्यावेळी या दोन्ही बंधूंनी त्यांची घरी जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती.