मुंबई

Kangana Ranaut : कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर राऊतांची प्रतिक्रिया; “चुकीचे…”

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क :  हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून नुकत्याच जिंकून आलेल्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत यांना  चंदिगड विमानतळावर कानशिलात लगावण्यात आली. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, " संसद सदस्यावर कोणी हात चालवणे चुकीचे आहे."

काय म्हणाले संजय राऊत?

  • संसद सदस्यावर कोणी हात चालवण चुकीचे
  • देशात शेतकऱ्यांचा सन्मानही झाला पाहिजे
  • आम्ही आमच्या पक्षासोबत बेईमानी करणार नाही

एका कॉन्स्टेबलने कायदा आपल्या आईसाठी हातात घेतला आहे. भारतमाताही तिची आई आहे. शेतकरी आंदोलनात बसलेले लोकही भारतमातेची पुत्र-कन्या होती. जर कोणी भारत मातेचा अपमान केला आहे आणि त्याचा कोणाला राग आला असेल तर यावर विचार करणे गरजेचे आहे. कंगणा संसद सदस्या आहेत आणि संसदेच्या सदस्यावर कोणी हात चालवणे चुकीचे आहे, पण देशात शेतकऱ्यांचा सन्मानही झाला पाहिजे.

येत्या ९ तारखेला मोदी सरकार शपथ घेणार आहेत यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले,  नऊ तारखेला शपथ घेत आहेत, सरकार चालवताना त्यांना नाकी नऊ येतील. नितीशबाबू आज तुमचे उद्या आमचे होतील. पुढे बोलताना म्हणाले, प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे, त्यांच्या फ्लॅटवरील जप्ती रद्द झाली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, प्रफुल पटेल यांच्यासारखा न्याय सर्वांना द्यावा. माझीही संपत्ती जप्त केली म्हणून मी दुसऱ्या कोणत्या पक्षात गेलो नाही. आम्ही आमच्या पक्षासोबत बेईमानी करणार नाही.

काय आहे कंगना रनौत प्रकरण

नवनिर्वाचित खासदार कंगना रनौतला चंदिगड विमानतळावर कानशिलात लगावण्यात आली. कंगना यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांना विमानाने दिल्लीला जायचं होतं. सिक्युरिटी चेक इननंतर त्या बोर्डिंगसाठी जात असताना एलसीटी कुलविंदर कौर (सीआयएसएफ युनिट चंदीगड विमानतळ) हिने कानशिलात लगावली. त्यानंतर कंगना रानौत यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या मयंक मधुरने कुलविंदर कौरला कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केला. कंगना यांच्या आरोपावरून आता CISF महिला जवानाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रिपोर्ट्सनुसार, कंगना रनौतने याप्रकरणी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यानुसार शेतकरी आंदोलनादरम्यान कंगनाने दिलेल्या वक्तव्यामुळे सीआयएसएफ महिला जवान संतप्त झाल्याचे तिचे म्हणणे आहे. याच कारणामुळे जवानाने कानशिलात मारल्याचा आरोप कंगनाने केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंडी मतदारसंघातून कंगणा खासदार

राजकारणात नशीब आजमावण्यासाठी कंगना रानौत पहिल्यांदाच मंडीतून रिंगणात उतरली. भाजपने कंगनाला तिच्या स्वतःच्या जिल्ह्यातून मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीत कंगनाने जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना कंगनाने 74 हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT