Sanjay Raut vs Amol Mitkari : "सध्या तरी महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अर्थखाते सांभाळणारा कोणीच नाही. अर्थखातं फडणवीसांकडेच राहणं शहाणपणाचं आहे," अशी सूचना करत फडणवीसांच्या अर्थमंत्री म्हणून कारभाराचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी कौतुक केले. राऊत यांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, संजय राऊतांनी 'कळलावे' उद्योग बंद करावेत, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच अर्थमंत्रीपद राहिल, असा विश्वास व्यक्त केला.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा दुसरा नेता दिसत नाही, अशी स्तुतिसुमने संजय राऊत यांनी उधळली. "राज्याचे अर्थखाते मुख्यमंत्र्यांकडेच (देवेंद्र फडणवीस) राहावे. सध्या तरी महायुतीत हे खाते सक्षमपणे सांभाळेल असा दुसरा कोणी चेहरा मला दिसत नाही. त्यामुळे फडणवीसांकडेच अर्थखाते ठेवणे राज्यासाठी शहाणपणाचे ठरेल," असे स्पष्ट मत राऊत यांनी व्यक्त केले.
"मी कोणतीही गुगली टाकत नाही, जे काही बोलतो ते स्पष्ट बोलतो. देशातील मोदी नावाच्या विकृतीविरोधात आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे," असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ काँग्रेसला घाबरतात. त्यामुळे देशपातळीवर काँग्रेस मजबूत झाली पाहिजे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, भूतकाळात काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सर्व नेत्यांनी आणि पक्षांनी आता पुन्हा एकत्र आले पाहिजे. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला, तर ते देशाच्या राजकारणासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'पुढारी न्यूज'शी बोलताना मिटकरी म्हणाले, "संजय राऊत यांचे नावच 'कळलावे' आहे. महायुतीमध्ये फूट पाडण्याचे हे त्यांचे उद्योग त्यांनी आता बंद करावेत. महायुती सरकारचे काम उत्तम सुरू असून राऊतांच्या विधानांना सध्या कोणीही गंभीरपणे घेत नाही."
पुढील रणनीती स्पष्ट करताना मिटकरी म्हणाले, "देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत यात शंका नाही, परंतु अर्थमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अधिकार आहे. अनेक वर्षे आमच्या पक्षाने हे खाते अत्यंत सक्षमपणे सांभाळले आहे. संजय राऊत यांनी सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करू नये. महायुतीत सगळे काही आलबेल आहे."