

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन्ही शिवसेना एकत्र यावे असे मत व्यक्त करत असाल आम्ही मातोश्रीवर तर बसलो आहोत. तुम्हाला पश्चात्ताप झाला असेल तर तो व्यक्त करण्याची जागा ही मातोश्री निवासस्थान आहे. ज्या पद्धतीने ते बाहेर पडले त्यासाठी पश्चात्ताप तर करावा लागेल ना? ते मातोश्रीवर आले तर विचार करू, असे वक्तव्य शिवसेना (उबाठा) नेते खा. संजय राऊत यांनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी बुधवारी (दि. ३) माध्यमांशी संवाद साधला. शिंदे सेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि संजय गायकवाड यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर खा. राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.
ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शाह यांची शिवसेना आहे. ज्यांचा स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली असेल त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी. तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहात. ही भूमिका का स्वीकारली, त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा, असेही राऊत यांनी सांगितले.
सरकारकडून जनतेची फसवणूक
मोदी-फडणवीस यांच्या घोषणा केवळ फसवणूक असतात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे. प्रत्येक योजनेत सरकार लोकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मोदींच्या सभांना जाणे बंद केले तर त्यांचे अनेक प्रश्न आपोआप सुटतील, असेही राऊत यांनी सांगितले.
उमेदवार न देणे ही चूक नाही
विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सध्या घोडेबाजार सुरू झाला आहे. या घोडेबाजारात शिवसेने (उबाठा) ने सहभागी होऊ नये, असे रवींद्र मिर्लेकर यांचे म्हणणे होते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. मतांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. मिर्लेकर यांची चूक नाही, अशी सारवासारवही खा. राऊत यांनी केली.
शिंदे गटच पहिल्या क्रमांकाचा शत्रू
नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरला हे चांगलेच आहे. यामुळे नगरसेवकांना आर्थिक बळ मिळेल, अशी खोचक टीका खा. राऊत यांनी केली. शिंदे सेना हा काही मोठा फोर्स नाही हे सर्व ठेकेदारीच्या पैशातून आलेले आहे.
आमच्याकडील मते कुणाला द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. तुम्हाला निकालाच्या वेळी कळेलच की, आम्ही कुणाला मतदान केले. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू शिंदे गटच आहे, असेही राऊत म्हणाले.