Sanjay Raut On Raj Thackeray joining Maha Vikas Aghad : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) असलेल्या महाविकास आघाडीत मनसे प्रमुख राज ठाकरे येणार का, या चर्चेलाही उधाण आले आहे.या प्रश्नाचे उत्तर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
स्वतः राज ठाकरे यांची भूमिका आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे; पण त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट करत संजय राऊत म्हणाले की, "त्यांचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही चर्चा करत आहोत. रविवारी (दि. १२) माझी वेणू गोपाल यांच्याशी चर्चा झाली. आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्याशी देखील चर्चा करू, कारण काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे. काँग्रेसच्या येथील नेतृत्वाला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. जसं अजित पवार आणि एकनाथ शिंदे इथे निर्णय घेत नाहीत, त्यांचा निर्णय दिल्लीत अमित शहा घेतात, तसंच काँग्रेसचंही आहे," असा टोला संजय राऊतांनी लगावला.
पुणे हे एक वेळचं विद्देचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर होतं; पण आज पुणे अजित पवार आणि भाजपच्या काही घटकांमुळे गुंडांचं माहेरघर झालेलं आहे. कोयता गँग ही संकल्पना पुण्यातूनच बाहेर आली."पुणे पोलीस आयुक्त काय करत आहेत? त्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून प्रेरणा घ्यायला हवी. पुण्यातील गुंडगिरी मोडीत काढण्याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे. पुण्यातील एक मंत्री केंद्रात आहेत. ज्या प्रकारे पुण्याची बदनामी सुरू आहे, ही गंभीर बाब आहे," अशा शब्दांत राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवारांसह भाजपवर हल्लाबोल केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "ठाणे महापालिका हद्दीत जे दंगेखोर, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, जी लाचलुचपत सुरू आहे त्याविरुद्ध मनसे आणि शिवसेना संयुक्त मोर्चा काढणार आहे. ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. हे उपायुक्त 'मिंडे पक्षाचे' हस्तक होते," असा टोलाही त्यांनी लगावला.
"मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये गुंडगिरीविरोधात मोहीम सुरू केली आहे. कोणाचाही मुलायमपणा न ठेवता, कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता, त्यांनी पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.भाजपमधील नगरसेवकांनाही मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही. अलीकडे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गुंडांच्या टोळीचा देखील पोलिसांनी बिमोड करण्याचे धोरण स्वीकारले आहे.आता अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील गुंडगिरीविरोधात देणं गरजेचं आहे. गणेश नाईक यांनी सुद्धा या रावणराजविरोधात आवाज उठवला आहे. मी त्यांचंही अभिनंदन करतो," असे राऊत म्हणाले.
"उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकार्यांना निवेदन देणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जो मुद्दा आहे की इंडिया आघाडी पक्षात नसलेले लोक त्यात आहेत; म्हणजे कोण आहेत हे स्पष्ट व्हायला हवे. इथे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी हा विषय नाही.आम्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर घटक पक्षांनाही निमंत्रण दिलं आहे. यात कोणीही राजकारण आणू नये. हे राजकीय शिष्टमंडळ आहे, हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी समजून घेतलं पाहिजे.हा विषय कोणत्याही एकट्या पक्षाचा नाही. मतदार घोटाळाप्रकरणी आम्ही निवेदन देऊन चर्चा करणार आहोत. यानंतर दुपारी दीड वाजता यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सकपाळ, राज ठाकरे, कॉ. अजित नवले यांना आम्ही आमंत्रित केलं आहे आणि ते सर्व येणार आहेत," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.