Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder Case : "प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू ही राजकीय हत्या आहे. काल मी समाजमाध्यमावर ठाण्यातल्या 'लेडी डॉन' मीनाक्षी शिंदेची क्लिप टाकली होती. ती लेडी डॉन आहे आणि ती कोणत्या भाषेमध्ये पूर्णेकरला धमक्या देते, आपण पाहिलं असेल? पूर्णेकर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप बाहेर आहेत. अशा प्रकरणांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील मारेकरी असतात, ते कधीच मुख्य सूत्रधाराचे नाव सांगत नाहीत. त्यासाठी त्यांची मानसिक आणि सगळी तयारी केलेली असते. पूर्णेकर यांच्या हत्येच्या षड्यंत्राचे सूत्रधार मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हेच आहेत," असा पुनरुच्चार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना केला.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, पूर्णेकर हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घालून एसआयटी स्थापन केली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. एसआयटीने तपास योग्य दिशेने आणि पारदर्शक पद्धतीने कोणत्याही दबावाखाली न करता केला तरच त्या तपासाला अर्थ राहील. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांचा जर त्यात समावेश केला गेला असेल... आता मी काही नावे पाहतोय, तर वरिष्ठ हे अधिकारी ठाण्यामध्ये कुणाच्या तरी मेहरबानीने बारा-बारा वर्षं, दहा-दहा वर्षं ठाण्यामध्येच आहेत आणि ते कोणाचे तरी एजंट म्हणून काम करतायत, अगदी उच्च पदावर आहेत. बारा-बारा वर्षं, एक अधिकारी बारा-बारा वर्षं एका ठिकाणी... अशा अधिकाऱ्यांकडून, जे तुमच्या गटाचे कार्यकर्ते म्हणून तुमच्या सेवेत रुजू आहेत, अशा अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस प्रदीप पूर्णेकर यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने होईल याची खात्री कशी देऊ शकतात?, असा सवालही त्यांनी केला.
गृहखात्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी या लेडी डॉनला दिले आहेत का? आणि सीपी हे सहन कसे करतात? या बाईला ताबडतोप अटक करून बेड्या घालून... सीपीच्या नावाने धमक्या देते हा पहिला गुन्हा आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देणे, हे दुसरं कोणी केलं असतं तर एवढ्याला त्याच्या घरी पोलीस जाऊन त्याला उचलून घेऊन गेले असते. मग या लेडी डॉनला... तुम्ही दाऊदच्या भावाला पकडता, तुम्ही यांना पकडता, तुम्ही मोठ्या-मोठ्या गुंडांना पकडता, पकडताना कारवाया करता ना तुम्ही? मग हिला का पकडत नाही? पूर्णेकरांच्या हत्येमागे जे षडयंत्र आहे, त्या षडयंत्राचे सूत्रधार मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हेच आहेत. एसआयटीने आणि ठाण्याच्या पोलिसांनी कितीही नवीन कहाण्या समोर आणल्या तरी आमचा त्याच्यावरती विश्वास नाही, जनतेचा विश्वास नाही. नवीन-नवीन स्टोरी तयार करतील, त्यातल्या काही स्टोरी मी पण तयार करून त्यांना सांगेन काय झालं ते, कसे झाले, असे झाले, तसे झाले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देणे, हे दुसरं कोणी केलं असतं तर एवढ्याला त्याच्या घरी पोलीस जाऊन त्याला उचलून घेऊन गेले असते. मग या लेडी डॉन मोकाट का फिरत आहे? तुम्ही दाऊदच्या भावाला पकडता, तुम्ही यांना पकडता, तुम्ही मोठ्या-मोठ्या गुंडांना पकडता, पकडताना कारवाया करता ना तुम्ही? मग हिला का पकडत नाही? पूर्णेकरांच्या हत्येमागे जे षडयंत्र आहे, त्या षडयंत्राचे सूत्रधार मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे हेच आहेत. एसआयटीने आणि ठाण्याच्या पोलिसांनी कितीही नवीन कहाण्या समोर आणल्या तरी आमचा त्याच्यावरती विश्वास नाही, असेही राऊत म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातच राज्य हे 'माफिया राज्य' केले आहे. महाराष्ट्रामध्ये गुंडांनाच एकत्र करून टाकले, एक नंबरचे सगळे गुंड, झुंड, टोळीवाले यांना आपल्या पक्षात घेतलेले आहे. त्यांनी त्यांच्या मदतीने भारतीय जनता पक्ष हा गुंडांचा पक्ष केलेला आहे. भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष केला आहे. ठाण्यामधल्या गुंडगिरीला अमित शहा जबाबदार आहेत. त्याच्यामुळे हे आम्ही या पूर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे अमित शाह जेव्हा इथे येतील, तेव्हा त्यांना सुपूर्द केले पाहिजेत, त्यांच्या अंगावर फेकले पाहिजेत, असेही राऊत म्हणाले.
पोलीस आयुक्त हे ठाण्यातल्या पालकमंत्र्यांचे नोकर आहेत का? हे राज्याच्या गृहमंत्र्यांना समजत नाही का? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नाही का की ठाण्यातले पोलीस खाते वेगळे आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातले वेगळे आहे? ठाणे गृहखात्याच्या भागात येत नाही का? माझे आव्हान आहे गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यांना, नुसते बोलताय काय तुम्ही? या ठाण्यामध्ये जा, पूर्णेकरांच्या घरी पहा, त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहा. नेतृत्व करा ठाण्याचे. या गुंडगिरीविरुद्ध मोहीम उभी करा, एक आम्ही तुमच्याबरोबर आहोत. गणेश नाईक बोलतायत, प्रखरपणे बोलतायत या गुंडगिरीविरुद्ध. पण जेव्हा एक खून पडतो एका राजकीय कार्यकर्त्याचा, तेव्हा तुम्ही गप्प आहात, हा सगळ्यांनाच प्रश्न आहे, असेही राऊत म्हणाले.