मुंबई: देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून गेले तर राज्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील. असे भाकीत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री होतील आणि त्यांचे राज्यातील उत्तराधिकारी म्हणून ते मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची शिफारस करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्याचवेळी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
फडणवीस हे केंद्रीय मंत्री होतील, पण त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी आमचीही इच्छा आहे. २०२९ पूर्वी ते पंतप्रधान व्हावेत, असे राऊत म्हणाले.
अफवांचा बाजार : बावनकुळे
सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच एक अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिली.
महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. हे सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे, असे बावनकुळे म्हणाले.
फडणवीस यांनी केंद्रात जावे आणि शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, असे शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यावर टोला लगावत बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये.