मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेना (उबाठा) आणि मनसेसोबत असावे, अशी आमची भूमिका आहे. पण बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर आत्मविश्वास वाढला असेल तर काँग्रेसने खुशाल स्वतंत्र लढावे, असा खोचक सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. आजारपणानंतर प्रथमच त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मते मांडली.
राऊत म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीत राज यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रेझेंटेशन दाखवले आहे. या दोन्ही नेत्यांचे उत्तम चालले आहे. राज सोबत आल्याने भाजपचा पराभव होणार आहे. अदानींच्या घशात मुंबई घातली जात आहे. ते थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदेंची शिवसेना असे आपण कदापि म्हणणार नाही. ती शिंदे सेना आहे. या सेनेचा कोथळा अमित शहाच काढणार आहेत.
नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार संपत असताना शिंदे गटाच्या गुलाबो गँगने 1 तारखेला लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे. एका मतामागे काही ठिकाणी 10 हजार, 15 हजार लक्ष्मीदर्शन सुरू आहे. आता निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे. नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये पैशांचा इतका खेळ कधीही झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवतच नव्हते. स्थानिक पातळीवरच या निवडणुका होत होत्या.
आता पाच-सहा हेलिकॉप्टर्स, खासगी विमाने प्रचारात पाहण्यास मिळत आहे. आम्ही निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत. तसे मुळीच नाही. मागच्या चार-पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. सध्याच्या घडीला तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा सत्ताधारी पक्षांत चालली आहे, असे परखड मतही त्यांनी मांडले.
एक महिन्यापेक्षा जास्त काळ घरच्या आणि रुग्णालयाच्या कैदखान्यात मी आहे. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे माझ्यावर लक्ष आहे. निवडणुका असल्या तरीही त्यांनी मला प्रचारासाठी बाहेर पडू दिले नाही. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. आता तब्येतीत सुधारणा होत आहे. डिसेंबरनंतर मी पूर्ण बरा होईन. रेडिएशनचा भाग संपला आहे. डॉक्टरांची टीम चांगले काम करते आहे. मी बरा असतो तर नगरपालिका प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरलो असतो.
मोदी, फडणवीस, शिंदे यांच्याकडून विचारपूस
मी आजारी असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी विचारपूस केली आणि मदतीचेही आश्वासन दिले. राजकारणापलीकडे काही नाती जपायची असतात, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.
संजय राऊत बरे झाले याचा आम्हाला आनंद आहे. त्यांनी त्यांचे काम करावे, आम्ही आमचे काम करत आहोत. राऊत हे रोज काय बोलतात त्याला उत्तर देणे मी महत्त्वाचे समजत नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस