मुंबई: सायनच्या रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरूवात केली आहे. याअंतर्गत जीर्ण झालेल्या नर्सिंग आणि आरएमओ इमारती पाडण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली असून, रहिवाशांना नव्या वसतिगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. पाडकाम सुरू असलेल्या परिसरात बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या जागेवर 1,550 कोटी रुपयांच्या खर्चाने आधुनिक इमारती उभारल्या जाणार आहेत. रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यात 2,462 कोटी रुपयांचा आणखी मोठा बांधकाम प्रकल्प सुरू होणार आहे. यात चार बहुमजली अत्याधुनिक इमारतींचा समावेश आहे.यात ऑन्कोलॉजी इमारत, मुख्य रुग्णालय इमारत,आपत्कालीन विभाग इमारत, ओपीडी इमारत यांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेले स्वयंपाकघर आणि वॉर्ड क्रमांक 8 असलेली विंग पाडून त्या जागेवर 12 मजली नवीन इमारत बांधली जाईल. तर नर्सेस आणि आरएमओ क्वार्टर्सच्या जागी दोन तळमजल्यांसह 20 मजली इमारत प्रस्तावित आहे.
सायन रुग्णालयात सध्याची 1,900 बेड क्षमता संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तब्बल 5,000 बेडपर्यंत वाढणार आहे. नव्या इमारतींमध्ये कॅन्सर उपचारासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असून रेडिओथेरपी, कीमोथेरपी, सिटी स्कॅन, आयसीयू, ऑपरेशन थिएटर यांसारख्या अत्याधुनिक सेवा रुग्णांना मिळणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
इमारतींचे आराखडे मंजूर झाले आहेत. बांधकाम पाडण्याचे काम सुरू असून पर्यावरण विभागाची परवानगी मिळताच नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होईल. या सुविधांमुळे रुग्णांना उत्तम आणि सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.