Sanjay Raut Poisoning in Jail Rahul Gandhi Pudhari
मुंबई

Sanjay Raut: संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी....; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?

Sanjay Raut Poisoning in Jail: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही संशय व्यक्त करत Toxic Test करण्याचा सल्ला दिल्याचा दावा राऊतांनी केला.

Rahul Shelke

Sanjay Raut Poisoning in Jail: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातील काळ आणि त्यानंतर उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांबाबत मत व्यक्त केलं आहे. तुरुंगात असताना आपल्या अन्नातून काही घातक पदार्थ शरीरात गेले असण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्याला सावध करत Toxic Test करून घेण्याचा सल्ला दिल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले की, तुरुंगात असताना एखाद्या कैद्याच्या खाण्यापिण्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संशय केवळ माझ्यापुरता मर्यादित नसून तुरुंगात असलेल्या अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत अशी भीती असू शकते. सरकारकडे सत्ता आणि यंत्रणा असल्याने तुरुंगातील व्यक्तीबाबत काहीही घडू शकते, असा आरोपही त्यांनी केला.

राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता

सुमारे दहा दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट झाल्याचे सांगत राऊत यांनी या भेटीतील चर्चेची माहिती दिली. आपल्या प्रकृतीबाबत राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली आणि आजाराचे नेमके कारण शोधण्यासाठी Toxic Test करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले, असा दावा राऊत यांनी केला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच आपल्या प्रकृतीच्या समस्या वाढल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजाराचा संबंध तुरुंगातील परिस्थितीशी आहे का, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

"तुरुंगातील परिस्थिती अत्यंत कठीण होती"

दरम्यान, कोल्हापुरात झालेल्या एका मुलाखतीत राऊत यांनी तुरुंगातील परिस्थितीचा अनुभवही सांगितला. अनेक कैदी एकाच खोलीत राहत होते. पुरेशी हवा, स्वच्छता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा दावा त्यांनी केला.

आपण हृदयविकाराचे रुग्ण असूनही तुरुंगातील परिस्थिती अत्यंत त्रासदायक होती, असे राऊत यांनी सांगितले. आपल्या आरोग्याच्या समस्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रकर्षाने जाणवू लागल्या आणि त्यामागची कारणे तुरुंगातील काळात शोधावी लागतील, असे त्यांनी नमूद केले.

VIP कोठडीचा मुद्दाही उपस्थित

तुरुंगातील एका वेगळ्या कोठडीचाही राऊत यांनी उल्लेख केला. त्या कोठडीत तुलनेने चांगल्या सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सामान्य कैद्यांना त्या ठिकाणी ठेवले जात नसल्याचा दावा त्यांनी केला.

ही कोठडी कोणासाठी तयार करण्यात आली आहे, अशी विचारणा केल्यानंतर ती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या आरोपींसाठी असल्याचे सांगण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले. ब्रिटिश न्यायालयाशी संबंधित काही सूचनांमुळे त्या कोठडीची रचना करण्यात आल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

"मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न"

तुरुंगातील गैरसोयी केवळ आपल्यापुरत्या नव्हत्या, तर इतर कैद्यांनाही त्याचा सामना करावा लागत होता, असा दावा राऊत यांनी केला. अशा परिस्थितीत शारीरिक त्रासासोबत मानसिक दबावही निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

"तुरुंगात राहूनही जगायचे आहे आणि कधी सुटका होईल हे माहीत नसते," अशा शब्दांत त्यांनी त्या काळातील परिस्थितीचे वर्णन केले. मात्र, अशा अनुभवांमुळे आपले मानसिक खच्चीकरण करणे शक्य नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊतांच्या दाव्यांमुळे चर्चेला उधाण

संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तुरुंगात विषप्रयोग झाला होता का, याबाबत अद्याप कोणताही वैद्यकीय किंवा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. Toxic Test चे निष्कर्ष आल्यानंतर या दाव्यांबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT