मुंबई

Sanjay Raut | 'नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी भाजपमध्येच षडयंत्र' : खासदार संजय राऊतांचा नेमका रोख कोणाकडे?

Sanjay Raut | महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये दोन गट

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut Claims BJP Conspiracy to Remove PM Narendra Modi

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटवण्यासाठी भाजपमध्येच एका गटाकडून षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी आज (दि. २१) माध्यमांशी बोलताना केला.

भाजपमध्ये दोन गट; मोदींना हटवण्याचे प्रयत्न

संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकावरून भाजपमध्ये दोन स्पष्ट गट पडले आहेत. भाजपमधील एका गटाला पंतप्रधान मोदींना पदावरून घालवण्याचे वेध लागले आहेत. "या गटात देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे मला माहिती नाही, पण मोदींनंतर देशाची सत्ता आपल्याकडेच राहावी, यासाठी ८५० खासदारांचे षडयंत्र 'डिलिमिटेशन' (मतदारसंघ पुनर्रचना) माध्यमातून रचले जात आहे, ते सत्य आहे," असा दावा त्यांनी केला.

अमित शहांच्या विरोधात भाजपमधूनच 'काउंटर' फोन

"मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचे सूत्रधार अमित शाह होते. त्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांना फोन केले होते, मात्र त्याच वेळी 'या विधेयकाला विरोध करा' असे सांगणारे काउंटर फोन सुद्धा भाजपमधीलच एका गटाकडून येत होते. हे विधेयक म्हणजे भाजपमधील अंतर्गत वादाचा विद्रोह आहे," असा दावा राऊत यांनी केला.

"पवारांची पातळी गाठायला फडणवीसांना १०० जन्म लागतील"

"देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे. शरद पवारांची राजकीय आणि सामाजिक पातळी गाठण्यासाठी फडणवीसांना १०० जन्म घ्यावे लागतील. पवारांनी या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात जे स्थान निर्माण केले आहे, त्याबद्दल बोलताना फडणवीसांनी आपली पातळी ओळखावी," असेही राऊत म्हणाले.

"गुजरातचा मुख्यमंत्री कोण? मला माहित नाही"

"देशात अनेक मुख्यमंत्री आहेत, पण गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे नाव काय, हे मला काल विचार करूनही आठवत नव्हते. त्यांनी आपली नेमकी पातळी काय आहे हे आधी तपासावे," अशी बोचरी टीका त्यांनी केली.

निवडणूक जिंकण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर

साताऱ्यातील संघर्षाचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. "साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ज्या प्रकारे पोलीस यंत्रणेचा वापर झाला, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. जर एका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ही अवस्था असेल, तर विधानसभा आणि लोकसभेसाठी हे लोक काय करतील?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महिला आरक्षणावरून भाजप केवळ 'फसवाफसवी'

महिला आरक्षणावरून भाजप केवळ 'फसवाफसवी' करत असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, "मोदी स्वतःला सेवक आणि कार्यकर्ता मानतात, तर भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याशी या विषयावर चर्चा करून दाखवावी. हे केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अर्धवट सोडले. हिंदू पर्यटक मारले जात आहेत, त्यांची कुटुंबे वाऱ्यावर आहेत आणि हे लोक मात्र 'हिंदुत्व धोक्यात आहे' असे सांगून मते मागत फिरत आहेत," असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT