मुंबई

काँग्रेसचे शतक! सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा बिनशर्त पाठिंबा

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी आज (दि. ६) काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आज त्यांनी विश्वजित कदम यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिक्कार्जून खर्गे यांची भेट घेत काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की, "मी माझ्या समर्थनाचे पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले आहे. पाटील घराणे तीन पिढ्यांपासून, वसंतदादा पाटील यांच्यापासून काँग्रेस सोबत आहे. त्यामुळे मी निवडून आल्यानंतर तातडीने काँग्रेसला समर्थन पत्र दिले. मी काँग्रेस सोबत आल्यानंतर काँग्रेसचे शतक पूर्ण झाले आहे, याचा मला आनंद आहे. यापुढेही सांगली जिल्ह्यात आणि राज्यात काँग्रेस पक्ष अधिकाधिक मोठा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दरम्यान, उद्या (७ जून) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस खासदारांची बैठक आणि सत्कार सोहळा मुंबईत पार पडणार आहे. या सत्कार कार्यक्रमाचे आणि ८ जूनला दिल्लीत होत असलेल्या काँग्रेस खासदारांच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे, असेही विशाल पाटील यांनी सांगितले.
त्यानंतर बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, "विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. मात्र काही कारणाने नाईलाजास्तव त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. मात्र, सांगलीच्या जनतेने त्यांना लोकसभेत पाठवले आहे." शिवसेना ठाकरे गटाकडून सांगलीत महाविकास आघाडीचा धर्म पाळला गेला नसल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर बोलण्याचे मात्र विश्वजीत कदम यांनी टाळले.

  हेही वाचा :

SCROLL FOR NEXT