पुढारी ऑनलाईन डेस्क : Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींनी भाजपचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांनी देशाच्या जनतेची फसवणूक करून शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा केल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि.6) पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, 'लोकसभा निवडणूक सुरू असताना दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशातील जनतेला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, निकालाच्या दिवशी 4 जूनला शेअर बाजार कोसळले. तत्पूर्वी एक्झिट पोलनंतर 3 जूनला शेअर बाजारात लक्षणीय वाढ झाली होती. पण 4 जून रोजी घसरला. 4 जूनला शेअर बाजार कोसळणार हे माहीत असतानाही मोदी सरकारने शेअर बाजाराबाबत संभ्रम का पसरवला,' असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी मीडिया चॅनेल्स आणि सर्व्हे कंपन्यांच्या एक्झिट पोलवरही प्रश्न उपस्थित केले. मीडियाने खोटे एक्झिट पोल का दाखवले, असा सवाल त्यांनी केला. गांधी म्हणाले की, 'निवडणुकीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर बाजारावर भाष्य केले. पंतप्रधान शेअर बाजाराच्या वाढीबद्दल बोलत असताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, लोकांनी 4 जूनपूर्वी शेअर्स खरेदी करावेत. पण 4 जून रोजी बाजार कोसळला. शेअर बाजारामुळे देशाचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे आम्ही बनावट एक्झिट पोल आणि शेअर बाजारातील घोटाळ्याची जेपीसी चौकशी व्हावी अशी अमची मागणी आहे,' असे राहुल गांधींनी स्पष्ट केले.