Samir Choughule on CJP Protest File Photo
मुंबई

Samir Choughule: मुलामुलींची डोकी फुटताना बघून आनंद होत असेल तर…; समीर चौघुले यांनी सुनावले

'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर अभिनेते समीर चौघुले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Samir Choughule on CJP Protest

मुंबई: 'नीट' पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात संघर्ष उडाला आहे. पोलिसांच्या लाठीमारामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. देशभरातून या आंदोलनासाठी तरुण आणि नागरिक दिल्लीकडे कूच करत आहेत. यादरम्यान, पोलिसांकडून सुरू असलेल्या अमानुष वर्तणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर विरोधकांसह विविध क्षेत्रांतील लोकांकडूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनीही या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

समीर चौघुले यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आत्ताच एकाची पोस्ट वाचली 'परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून आत्महत्या केलेल्या मुलांना असंच पाहिजे. जे स्वतःचा जीव वाचवू शकत नाहीत, ते डॉक्टर होऊन उद्या लोकांचे जीव काय वाचवणार? सुन्न झालो! आपण माणसे उरलो नाही, 'झॉम्बी' झालो आहोत. हा कोणता उन्माद आपल्या सर्वांच्या डोक्यात भरला आहे? त्या तरुण, कोवळ्या मुलामुलींची डोकी फुटताना बघून जर कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कोणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असेल, किंवा 'असंच पाहिजे या मुलांना' असा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडला आहे. प्रत्येक गोष्ट संवादाने १०० टक्के सोडवता येते. चर्चा व्हायला हवी होती. तरुण, कोवळ्या मुलांवर अत्यंत क्रूरतेने बरसलेल्या लाठ्या खूप व्यथित करतात. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही बाजूने हिंसा होता कामा नये. मुलांचे म्हणणे आणि त्यांच्या समस्या यांना अग्रक्रम दिलाच पाहिजे."

यासोबतच, चौघुले यांनी ट्रोल करणाऱ्यांना आणि सल्ले देणाऱ्यांनाही थेट शब्दांत सुनावले आहे,

'कलाकारांनी कामावर लक्ष द्यावे, भानगडीत पडू नये' असे सल्ले देऊ नयेत: हा नियम तुम्हा सर्वांनाही लागू होतो. मीसुद्धा तुमच्यासारखाच या देशाचा नागरिक आहे. तुम्ही जसे हिरिरीने मत मांडता, तसे मीही मांडत आहे.

'पहलगाम घटनेच्या वेळी तोंड बंद होते का?': त्या वेळीसुद्धा मी व्यक्त झालोच होतो. त्यामुळे 'त्या वेळी का बोलला नाहीत?' या वर्गवारीत मला टाकू नये.

'आजपासून अनफॉलो करतो': जशी आपली इच्छा! आनंदी राहा, तुमचे भले होवो. फक्त शांतपणे अनफॉलो करा, कमेंट करून सांगू नका.

द्वेषाचा निचरा करण्यासाठी दुसरी जागा शोधा: मनातील द्वेष बाहेर काढण्यासाठी वेगळी जागा शोधा. कृपया येथे गलिच्छ, शिवराळ आणि हिणकस भाषा वापरू नका.

'या पोस्टसाठी किती पैसे मिळाले?': तुम्हाला मिळतात त्यापेक्षा थोडे जास्त!

जंतर-मंतरवर आंदोलकांचा तीव्र एल्गार, कडेकोट बंदोबस्त

नीट पेपर लीकप्रकरण आणि शिक्षणव्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीवरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले आंदोलन अधिकच आक्रमक झाले आहे. गुरुवारीही या ठिकाणी हजारो आंदोलकांनी गर्दी केली असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. यापूर्वी बुधवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला हिंसक वळण लागून झालेल्या दगडफेकीत दोन साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधून सीआरपीएफच्या २० तुकड्या तातडीने दिल्लीत तैनात केल्या आहे.

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जंतर-मंतरवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये पहिली चकमक उडाली. आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्या आणि दगडफेक केली. या हल्ल्यात पंजाबी बागचे एसीपी जयप्रकाश जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत आंदोलकांना पांगवले. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास एनडीएमसी चौक आणि टॉलस्टॉय मार्गावर आंदोलकांनी पुन्हा दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि 'आरएएफ'च्या जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज केला. या दुसऱ्या घटनेत एसीपी विवेक भगत यांच्यासह अन्य दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT