आता ‘त्याच’ दिवशी वटणार धनादेश! pudhari photo
मुंबई

cheque clearance : आता ‘त्याच’ दिवशी वटणार धनादेश!

नव्या बदलाची अंमलबजावणी 4 ऑक्टोबरपासून होणार : दोन दिवसांची प्रतीक्षा संपणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः धनादेशाची रक्कम त्याच दिवशी संबंधितांच्या खात्यात जमा होणार आहे. आता त्यासाठी दोन दिवस वाट पाहण्याची गरज भासणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) नवे बदल येत्या 4 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे खात्यात रक्कम असल्याची खात्री करूनच धनादेश द्यावा लागणार आहे. आता पूर्वीप्रमाणे खात्यात पैसे जमा करण्यास फार कालावधी मिळणार नाही.

आरबीआयने 13 ऑगस्ट 2025 रोजी आदेश काढत धनादेश वटविण्याचा कालावधी कमी केला आहे. त्याची अंमलबजावणी दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा येत्या 4 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यानुसार धनादेश वटण्यासाठी दिलेल्या दिवसातच पैसै संबंधितांच्या खात्यात जमा होतील. दुसरा टप्पा 3 जानेवारी 2026 पासून सुरू होईल, त्यानुसार ही प्रक्रिया आणखी वेगवान होईल. काही तासांतच धनादेश वटविला जाणार आहे. सध्या धनादेश वटविण्यासाठी दिलेला दिवस आणि दुसरा कामाचा दिवस अशा कालावधीत धनादेश वटविला जातो. मध्ये सुट्टी असल्यास धनादेश वटण्याचा कालावधी त्याप्रमाणात वाढतो.

पहिल्या टप्प्यात सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत विविध बँकांच्या शाखांकडून प्राप्त झालेले धनादेश स्कॅन केले जातील. बँकांकडून त्वरित आणि सतत क्लिअरिंग हाऊसमध्ये धनादेश पाठवले जातील. क्लिअरिंग हाऊसदेखील धनादेश देणार्‍या बँकांना सतत धनादेशाचे फोटो पाठवेल.

बँकांकडून सकाळी 10 वाजता धनादेशावर प्रक्रिया सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजता बंद होईल. सादर केलेल्या प्रत्येक धनादेशासाठी पैसे देऊ करण्याची जबाबदारी असलेली बँक (ड्रॉई बँक) धनादेश वटवेल अथवा खात्यात पैसे नसल्यास त्यासाठी नकारात्मक नोट जारी करेल. पैसे देण्याची जबाबदारी असलेल्या बँकेने धनादेशाची प्रतिमा प्राप्त होताच सतत धनादेश वटविण्याची अथवा नाकारण्याची प्रक्रिया करावी. प्रक्रिया केल्यानंतर लगेचच पैसे देण्याची जबाबदारी असलेल्या ड्रॉई बँकांनी (सकारात्मक/नकारात्मक) माहिती क्लिअरिंग हाऊसला पाठवावी.

पहिल्या फेजमध्ये इतका वेळ

फेज 1 दरम्यान 4 ऑक्टोबर ते 2 जानेवारी 2026 पर्यंत ड्रॉई बँकांना सत्राच्या शेवटी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता सादर केलेल्या धनादेशांवर (सकारात्मक/नकारात्मक) निर्णय घेणे आवश्यक असेल. संबंधित बँकेने त्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यास संबंधित धनादेश मंजूर झाले, असा मानून पुढील प्रक्रिया केली जाईल. पहिल्या फेजमध्ये धनादेशची अंतिम वेळ संध्याकाळी 7 असेल.

अशी असेल फेज-2

फेज 2 मध्ये 3 जानेवारी 2026 पासून, धनादेशावर प्रक्रिया करण्याची मुदत तीन तासांपर्यंत कमी केली जाईल. सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या धनादेशावर बँकांनी त्याच दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत (सकाळी 11 वाजेपासून 3 तासांत) कार्यवाही करावी. म्हणजेच, धनादेश वटणार किंवा नाही याचा अभिप्राय या वेळेत द्यायचा आहे. या कालावधीत बँकांनी कोणतीही प्रक्रिया न केल्यास धनादेश मंजूर मानले जातील. दुपारी 2 वाजता धनादेश वटविण्यासाठी कार्यवाहीसाठी पाठवले जातील.

असे जमा होतील पैसे

सकाळी 11 वाजल्यापासून सत्राच्या समाप्तीपर्यंत दर तासाला धनादेशावर कार्यवाही होईल. क्लिअरिंग हाऊस संबंधित बँकेला सकारात्मक आणि नकारात्मक निर्णयांची माहिती देईल. त्यानुसार बँक प्रक्रिया करेल आणि ग्राहकांना ताबडतोब पैसे देईल. या प्रक्रियेनंतर एक तासाच्या आत संबंधितांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT