मुंबई : मुंबई शहरात समाजवादी पार्टीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या अंतर्गत वादामुळेच मुस्लिम मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होऊन, मुस्लिम समाजाने एमआयएमचा पर्याय शोधला. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सपाचे जेमतेम दोन नगरसेवक निवडून आले तर एमआयएमचे आठ नगरसेवक निवडून आले.
मुंबईत समाजवादी पार्टीचे स्वतःचे अस्तित्व होते. शिवाजीनगर गोवंडी या भागातून समाजवादी पार्टीचे अबू आझमी आमदार म्हणून निवडून आले आहेत. एवढेच काय तर, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही सपाचे किमान ६ नगरसेवक निवडून येत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून समाजवादी पार्टीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी व त्यांचे खास समर्थक भिवंडीचे आमदार रईस शेख यांच्यात कटूता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेख काहीसे समाजवादी पार्टी पासून दुरावल्याचे दिसून येत आहे. शेख यांना मानणारा मोठा मुस्लिम वर्ग असल्यामुळे भिवंडी विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून निवडून येतात. मुंबईतील नागपाडा, आग्रीपाडा, भायखळा आदी परिसरात नगरसेवक असल्यामुळे स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. मुंबई महापालिकेत गटनेता असताना शेख यांनी समाजवादी पार्टीची बांधणी मजबूत केली होती.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे, यासाठी शेख यांनी म्हणावे तेवढे प्रयत्न केले नाहीत. आपल्या समर्थकांना त्यांनी एमआयएम व काँग्रेसमधून उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. एमआयएममधून निवडून आलेले नगरसेवकही शेख यांनाच आपला नेता मानत असल्याचे दिसून आले आहे.
२०१७ मध्ये समाजवादी पार्टीचे ६ नगरसेवक होते. तर एमआयएमचे २ नगरसेवक होते. आता समाजवादी पार्टीचे दोन तर एमआयएमचे आठ नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये एमआयएमचे नगरसेवकांना विविध समित्यांमध्ये सदस्य पद मिळणार आहे. एवढेच काय तर गटनेता म्हणून महापौरांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या गटाने त्यांच्या बैठकीतही सहभागी होता येणार आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीला कुठे स्थान राहिलेले नाही.