Sahil Wakode pudhari photo
मुंबई

Sahil Wakode Case : साहिलकडून लिहून घेतला माफीनामा ?

विद्यार्थ्यांचा दावा; आयआयटीच्या नियमावलीत माफीनाम्याची तरतूदच नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्यावर परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्याकडून लेखी माफीनामा लिहून घेण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, परीक्षेतील गैरप्रकारांबाबत संस्थेच्या अधिकृत नियमावलीत माफीनामा लिहून घेण्याची तरतूद नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात निर्धारित नियम आणि प्रक्रियेचे पालन झाले होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे प्रशासनाकडे मागितली असल्याचे समजते.

आयआयटी मुंबईच्या एप्रिल २०१५ मधील नियमावलीनुसार, परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळल्यास पर्यवेक्षकाने संबंधित साहित्य जप्त करून घटनेची सविस्तर नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याला नवीन उत्तरपुस्तिका देऊन परीक्षा पूर्ण करण्याची संधी देण्याची तरतूद आहे.

संबंधित प्रकरण विभागप्रमुखांकडे पाठवून पुढील चौकशीसाठी विभागीय शैक्षणिक शिस्तभंग कृती समितीकडे (डीएडीएसी) सादर केले जाते. ही समिती उपलब्ध पुराव्यांची छाननी करून गैरप्रकाराचे स्वरूप निश्चित करते. पुरावे स्पष्ट नसल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्याला देण्याची तरतूदही नियमावलीत आहे. समितीचा अंतिम अहवाल मान्यतेसाठी अधिष्ठाता (शैक्षणिक कार्यक्रम) यांच्याकडे पाठविला जातो.

साहिलला परीक्षेदरम्यान दुपारी सुमारे १२.३८ वाजता पर्यवेक्षक प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांनी परीक्षा कक्षातून बाहेर जाण्यास सांगितल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेण्यात आले. तेथे त्याने कॉपी केल्याबद्दल लेखी माफीनामा दिल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. सीसीटीव्ही चित्रणानुसार, दुपारी सुमारे १.२५ वाजता साहिल वसतिगृहातील खोलीत परतला. त्यानंतर तो खोलीबाहेर आला नसल्याची माहिती समोर आली आहे.

साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी परिसरात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमावलीनुसार साहिलला नवीन उत्तरपुस्तिका देऊन परीक्षा पूर्ण करण्याची संधी का देण्यात आली नाही, तसेच त्याला परीक्षा कक्षातून बाहेर नेण्यामागे कोणती प्रक्रिया अवलंबण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

परीक्षांतील गैरप्रकारांच्या चौकशीसाठी एसओपी लागू करा !

परीक्षेतील गैरप्रकार हाताळण्याबाबत संस्थेच्या विविध विभागांमध्ये एकसमान प्रक्रिया नाही. त्यातच केंद्रीय प्रशासनाकडून नियमांच्या अंमलबजावणीवर पुरेसे नियंत्रण नसल्याने अशा प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. त्यामुळे परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी आणि त्यावरील कारवाईसाठी संपूर्ण संस्थेत एकसमान प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. साहिलच्या मृत्यूनंतर मध्यसत्राच्या उर्वरित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, एसओपी तयार झाल्यानंतर त्या घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एसआयटीकडून कागदपत्रांची मागणी

मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आयआयटी प्रशासनाकडे साहिलच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मागितली आहेत. साहिलवर करण्यात आलेल्या कारवाईची प्रक्रिया, संबंधित प्राध्यापकांची भूमिका आणि संस्थेने अवलंबलेले नियम यांची तपासणी केली जाणार आहे. प्राध्यापकांच्या कथित कृतीचा साहिलच्या मृत्यूशी काही संबंध होता का, तसेच त्याला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला होता का, या बाबींचाही तपास सुरू असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT