मुंबई: मुंबईतील २५० कोटी रुपयांच्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याचा कथित हस्तक साहिल शेख याला दुबईमध्ये अटक करण्यात आली आहे.
बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत दुबईत वास्तव्य करणाऱ्या साहिलच्या अटकेमुळे या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीच्या जाळ्यातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.
मुंबई पोलिसांच्या घाटकोपर अमली पदार्थविरोधी कक्षाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. साहिल शेख हा दुबईत राहून अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील व्यवहार आणि समन्वय सांभाळत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्याच्या अटकेमुळे या तस्करीचे परदेशातील संपर्क, आर्थिक व्यवहार आणि भारतातील वितरण साखळी उघड होण्याची शक्यता आहे.
भावाच्या चौकशीतून महत्त्वाचा धागा
साहिल शेखचा धाकटा भाऊ मोहम्मद सलीम सोहेल शेख ऊर्फ लॅविश याला पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान साहिलच्या दुबईतील वास्तव्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे समजते. या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी दुबईतील संबंधित यंत्रणांशी संपर्क साधला. त्यानंतर साहिलला ताब्यात घेण्यात आले.
साहिल हा सलीम डोलाच्या ड्रग्ज नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असल्याचा संशय असून, त्याच्याकडून या टोळीच्या कामकाजाची पद्धत, अमली पदार्थांची वाहतूक आणि आर्थिक व्यवहारांबाबत माहिती मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.या प्रकरणाचा तपास करताना मुंबईतील ग्लॅमर विश्वातील काही व्यक्तींची नावेही चर्चेत आली होती.
घाटकोपर एएनसीच्या पथकाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी आणि अभिनेता सिद्धांत कपूर यांची चौकशी केली होती. या चौकशीचा उद्देश ड्रग्ज पुरवठ्याचे संभाव्य संपर्क आणि व्यवहारांची माहिती मिळवणे हा होता.
२५२ कोटींच्या मेफेड्रोन जप्तीशी संबंध
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी सांगलीतील मेफेड्रोन निर्मिती कारखान्याच्या कारवाईशी जोडलेली आहे. मार्च २०२४ मध्ये मुंबई पोलिसांनी १२६.१४ किलो मेफेड्रोन जप्त केले होते. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे २५२.२८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणात सलीम डोला याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय तस्करीचे जाळे तपासाच्या केंद्रस्थानी आले.
दरम्यान, सलीम डोला याला एप्रिल २०२६ मध्ये तुर्कीमधून भारतात आणण्यात आले होते. त्याच्याविरोधात मुंबई आणि गुजरातमध्ये अमली पदार्थ तस्करीसंदर्भात विविध तपास सुरू आहेत. अंमलबजावणी संचालनालयानेही त्याच्या कथित आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू केला आहे.