

मुंबई: राज्य सरकारच्या अखत्यारीतील हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनमधील निविदा प्रक्रियेत कमिशनखोरी होत असल्याचा आरोप, ठेकेदाराने अधिकाऱ्याविरोधात केलेली लाचखोरीची लेखी तक्रार आणि तब्बल ४४० कोटी रुपयांच्या पोलिओ लसपुरवठ्याची ऑर्डर गमावल्याचे प्रकरण यामुळे हाफकिनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, १६१ कर्मचाऱ्यांनीही कथित भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्याने महामंडळातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
हाफकिनच्या मटेरियल मॅनेजमेंट विभागातील अधिकारी उमेश वसंत पवार यांच्याविरोधात एच. के. डेटा सर्व्हिसचे मार्केटिंग मॅनेजर संतोष धांदे आणि रफीक शेख यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे लेखी तक्रार केली आहे.
वाहतूक कंत्राटाच्या निविदेत स्वतःच्या मर्जीनुसार दर निश्चित करण्यास सांगून एकूण रकमेच्या १० टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार एक लाख ४० हजार रुपये विविध टप्प्यांत दिल्याचा दावा धांदे यांनी केला आहे. अजिंठा-जळगाव येथील ८४४ बॉक्सच्या वाहतुकीसह अन्य निविदांमध्येही पैशांची मागणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
६ ऑक्टोबर रोजी व्यवस्थापकीय संचालकांसमोर या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर उमेश पवार यांनी रफीक शेख यांना व्हॉट्सॲपवरून वारंवार संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी विनंती केल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे. यासंदर्भातील कॉलचे स्क्रीनशॉट असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या कथित गैरव्यवहाराची दखल घेत विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे.
मागील विधिमंडळ अधिवेशनात हाफकिनमधील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनाही स्वतंत्र पत्र पाठवून त्यांनी जाब विचारला आहे.
४४० कोटींच्या पोलिओ लस ऑर्डरचा वाद
दुसरीकडे, हाफकिनला केंद्र सरकारच्या सुमारे ४४० कोटी रुपयांच्या पोलिओ लसपुरवठ्याच्या निविदेतून तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरविण्यात आल्याचा मुद्दाही चर्चेत आला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये महामंडळाने सुमारे २०० कोटी रुपयांची पोलिओ लसपुरवठ्याची ऑर्डर मिळवली होती.
मात्र, जुलै २०२६ मध्ये ४४० कोटी रुपयांच्या निविदेत आवश्यक 'डब्ल्यूएचओ सर्टिफिकेट'चे नूतनीकरण आणि अन्य पूर्तता न झाल्याने हाफकिन अपात्र ठरल्याचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही हाफकिनमधील कथित भ्रष्टाचाराला अभय देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. १६१ कर्मचाऱ्यांचे निवेदन, एसीबीकडे तक्रारी, अंतर्गत चौकशी आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.