Rupali Chakankar
मुंबई: "माझे नाव, माझा फोटो, माझी ओळख, माझी वैयक्तिक शैली आणि स्वतःला सादर करण्याची माझी विशिष्ट पद्धत यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्यात आलेली आहे. माझ्या पूर्वपरवानगीशिवाय यांचा व्यावसायिक किंवा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्यास संबंधितांवर दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल," असा कडक इशारा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नाव आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणानंतर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट लवकरच येत असून, त्यामध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद या भूमिका साकारत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत चाकणकर यांनी ही कायदेशीर भूमिका स्पष्ट केली आहे.
चाकणकर यांनी आपल्या एक्स खात्यावर एक पोस्ट लिहीली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल."
अशोक खरात यांच्यावर १०० हून अधिक महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अनेक राजकीय व्यक्ती व प्रशासनातील अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. यावेळी रूपाली चाकणकर आणि खरात यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशोक खरात यांना अटक झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आपल्यावरील सर्व आरोप निराधार आहेत. सर्व फोटो आणि व्हिडिओ 'मॉर्फ' करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले, असा दावा करत त्यांनी यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.