Rohit Shetty Firing Case Mumbai Police Pudhari
मुंबई

Rohit Shetty house firing: जुहूमध्ये रोहित शेट्टींच्या घरावर गोळीबार; पुण्यातून अटकेला गेले पाच आरोपी

बिष्णोई टोळीचा संबंध उघड; सोशल मीडियावर धमकीचा मेसेज व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घरावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. गोळीबार करून पुण्याला पळून गेलेल्या शूटरसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अमान आनंद मरोटे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी, सिद्धार्थ दिपक येनपुरे, समर्थ शिवशरण पोमाजी आणि स्वप्निल बंडू सकट अशी या आरोपींची नावे असून ते सर्वजण पुण्याचे रहिवाशी आहेत. त्यांना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांचा गॅगस्ट लॉरेन्स बिष्णोईशी थेट संबंध असल्याचे समजते.

दहा मजली इमारतीत रोहित शेट्टी राहतात. रविवारी रात्री या इमारतीवर झालेल्या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. गोळीबाराच्या वेळेस रोहित शेट्टी हे घरीच होते.जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतलेे. एका फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती पायी त्यांच्या इमारतीजवळ येताना दिसतो.

रोहित शेट्टी यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, त्यांना कुठल्याही संघटित टोळीकडून धमकी आलेली नाही किंवा त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.

घटनास्थळी पोलिसांना पाच रिकाम्या पुंगळ्या सापडल्या. त्या कालिना येथील फारेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. गुन्ह्यांतील एक बाईक देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. याच बाईकवरुन शूटर जुहू परिसरात आले असावेत. ही बाईक जवळच पार्क करुन शूटर पायी चालत गेले आणि नंतर त्यांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर त्यांनी एका रिक्षाचालकाला कल्याणला सोडण्याबद्दल विचारले. मात्र, त्यांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यास तो तयार होता.

यापूर्वी सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर बसाच गोळीबार झाला होता. त्यांनतर राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मंत्री बाबा सिद्धीकी यांची वांद्र्यातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या गोळीबारात शुभम लोणकर मुख्य आरोपी होता. रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबारातही शुभमचा सहभाग उघडकीस असावा.

रोहित शेट्टी यांना काही शिस्त लावण्याची गरज आहे, त्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचा दावा बिष्णोई टोळीने केला आहे. यापुढे सुधारणा न झाल्यास त्यांचा गेमच करु असा मेसेज बिष्णोई टोळीने सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT