Rohit Pawar On Rahul Gandhi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी जास्त व्होकल असल्याचं दिसून येत आहे. राहुल गांधी हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून या दौऱ्याला विरोध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी नारी वंदन विधेयकाला विरोध केल्याचा आरोप राहुल गांधींवर केला आहे.
मात्र या भाजपच्या आंदोलनाला काऊंटर करण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे शड्डू ठोकून मैदानात उतरले आहेत. त्यांनी भाजपचे हे आंदोलन किती फोल आहे हे दाखवणारी सोशल मीडिया पोस्ट केली.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांना विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी यांच्याविरोधात आंदोलन करायला इतर कारणं मिळाले नाहीत म्हणून ‘नारी शक्ती वंदन’चं कारण शोधून काढलं, परंतु ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ तर २०२३ मध्येच संसदेत एकमताने पारित झालं, हे भाजपवाले विसरले का? कदाचित मनुस्मृतीवर राहुल गांधींनी आघात केल्यामुळं भाजपचा स्मृतीभ्रंश झाला असावा.
भाजपने केवळ राजकारणासाठी राहुल जी गांधी यांना विरोध करण्यापेक्षा नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांवर एखादं आंदोलन केलं तर बरं राहील...!'
या ट्विटला त्यांनी पंतप्रधान यांनी नारी शक्ती वंदन विधेयक पास झाल्यानंतर केलेल्या ट्विटची देखील जोड देत भाजप कार्यकर्त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे राज्यातील काँग्रेस नेते भाजपच्या या आंदोलनाबाबत फारसे बोलताना दिसत नाहीयेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार याबाबत आग्रही भूमिका मांडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे मुद्दे रोहित पवार आग्रही पद्धतीनं मांडत असल्यामुळं राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे.