मुंबई : पवईतील स्टुडिओमध्ये लहान मुलांना ओलीस ठेवण्याची योजना या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड रोहित आर्य याने एक महिन्यापूर्वीच बनविली होती. त्याचाच एक भाग म्हणून त्याने ऑडिशनचे नाटक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. शेवटच्या दिवशी त्याने १७ मुलांना खोलीत आणून त्यापैकी काहींचे हात-पाय बांधले, काहींच्या तोंडावर चिकटपट्टी लावल्याचे कृत्य केले होते, असे मुलांनी पोलिसांना सांगितले.
रोहितच्या या कृत्यामुळे सर्व मुले प्रचंड घाबरली होती. काही मुलांनी आरडाओरड करुन रडायला सुरुवात केली. हा प्रकार बाहेर असलेल्या पालकांना संशयास्पद वाटला. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने आतमध्ये शूटिंग सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र मुलांचा रडण्याचा आवाज थांबत नसल्याने त्याने त्यांना एअरगनने धमकाविण्याचा प्रयत्न केला. मुलांकडून ही माहिती नंतर त्यांच्या पालकांना देण्यात आली होती. याबाबत मुलांसह त्यांच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या मुलांनी रोहितने त्यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही सांगितले.
या मुलांसोबत दोन वयोवृद्धांना त्याने ओलीस ठेवले होते. सुरुवातीला ओलीस ठेवल्याचा सीन सुरू असल्याचे त्यांना वाटले, मात्र नंतर रोहितने त्यांना खरोखर ओलीस ठेवल्याचे समजले. त्यामुळे त्यांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला होता. गुन्ह्याच्या दिवशी रोहितने तिथे एअरगन, रॉड, ज्वलनशील पदार्थ आणले होते. याबाबत कोणालाही काहीही माहिती नव्हती, असे काही पालकांनी आपल्या जबानीत सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार रोहित आर्यने आधीच ठरल्याप्रमाणे ऑडिशनच्या शेवटच्या दिवशी ओलीस नाट्याचे शूटिंग करण्याची योजना बनविली होती. रोहित आर्याने लेट्स चेंज पर्व चारच्या निर्मितीचा निर्णय घेतला होता. या पर्वांचा तोच लेखक-निर्माता-दिग्दर्शक होता. त्यासाठी त्याला काही लहान मुलांची गरज होती. त्यामुळे त्याने मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरातील बारा ते पंधरा वयोगटातील मुलांना वेबसिरीजच्या ऑडिशनसाठी मुंबईत बोलाविले होते. पवईतील स्टुडिओमध्ये या मुलांचे चार दिवसांपासून ऑडिशन सुरु होते. ऑडिशनदरम्यान त्यांनी ३६ मुलांची निवड केली होती. त्यातून त्याने निवडक सतरा मुले निवडली आणि त्यांना स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममध्ये नेले होते.
या मुलांसोबत त्याला त्यांच्या पालकांना ओलीस ठेवायचे होते, मात्र ऐन वेळेस त्याने त्याची योजना बाजूला ठेवून फक्त मुलांवर फोकस केला होता. शेवटच्या दिवशी त्याने ओलीस नाट्याचे शूटिंग करण्याचे ठरविले होते. याबाबत त्याने त्याच्या युनिटच्या कर्मचाऱ्यांना आधीच माहिती दिली होती. त्यामुळे रोहित सकाळी तिथे लवकर आला होता. रुममध्ये आणल्यानंतर त्याने काही मुलांचे हातपाय बांधले, त्यांच्या तोंडाला टेप लावली होती.
हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर बसविले
लहान मुलांना ओलीस ठेवल्यानंतर सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रोहितने स्टुडिओच्या खिडक्यांना आणि दरवाजांन सेन्सर लावले होते. तसेच स्वरक्षणासाठी त्याने तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याचे मॉनिटर करत होता.
रोहित आर्य प्रकरणाचा तपास दोन युनिटकडे
या संपूर्ण घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यातील एका एडीआरच्या गुन्ह्यांचा तपास युनिट दोन तर ओलीस नाट्यानंतर घडलेल्या घटनेचा तपास युनिट आठकडे सोपविण्यात आला आहे. या दोन्ही युनिटच्या प्रमुखांना लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुलांसाठी खाऊ आणि चॉकलेट
गेल्या चार दिवसांपासून मुलांचे ऑडिशन सुरु होते. गुरुवारी रोहित प्रचंड चिडचिडा झाला होता. मुलांनी गोंधळ घालू नये तसेच ते शांत बसावेत म्हणून सर्व मुलांना खाद्यपदार्थासह चॉकलेट आणि कोल्ड्रिंक आणले होते. त्यानंतर त्याने सर्व मुलांना एका रुममध्ये जाण्यास सांगितले होते. त्या ठिकाणी कापड ठेवले होते. याच कपड्यावर त्याने ज्वलनशील रसायन टाकले होते. शूटिंगसाठी तसे केल्याचे त्याने युनिटमधील कर्मचाऱ्यांना सांगितले होते. त्याला क्राईम सीन रिक्रिशन करुन मुलांना कशा प्रकारे ओलीस ठेवले जाते याबाबत जाणून घ्यायचे होते. मात्र बराच वेळ मुले आणि रोहित रुममधून बाहेर आले नाही, तेव्हा पालकांनी पोलिसांना ही माहिती दिल्याचे तपासात उघडकीस आले.
रोहितचा मृतदेह जे. जे रुग्णालयात पाठविला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी दिवसभरात कोणीही आले नव्हते. त्याचा एक नातेवाईक रुग्णालयात आला होता. त्याची चौकशी करण्यात आली. त्याने चौकशीत काय सांगितले याचा तपशील समजू शकला नाही. रात्री उशिरा रोहितचे नातेवाईक जे. जेमध्ये दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन ते पुण्याकडे रवाना झाले.