Ritu Tawde on Jain Guru Pudhari
मुंबई

Ritu Tawde Controversial Statement: जैन गुरू नम्रमुनींच्या आशीर्वादामुळे घशाचा त्रास दुरुस्त झाला! रितू तावडे यांच्या वक्तव्याने नवा वाद

आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतो, असे स्पष्टीकरण देत जैन मुनींच्या आशीर्वादाने घसा दुरुस्त झाल्याचा दावा महापौरांनी कायम ठेवला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: जैन गुरूंच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार आहे, असे विधान मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आणि त्यावरून आता त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.

महाराष्ट्रात बुवाबाजीला अक्षरश: ऊत आला असून, चमत्कारांच्या सुरस कथांनी राजकारणालाही घेरले असतानाच एरव्ही चमत्काराच्या बुवाबाजीपासून दूर असलेल्या जैन गुरूंबद्दल महापौर तावडे यांनी हे विधान केल्याने खुद्द जैन समाजातही नाराजी व्यक्त होत आहे.

महावीर जयंतीनिमित्त बोरिवलीच्या एका कार्यक्रामात त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, गुरुदेवजींच्या औषधामुळे घशाचा आजार बरा झाला असे मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणतात. खरातच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरे वाटले. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला कोणत्या औषधाने बरे वाटले. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो...

या टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. त्यांच्या घरी काही आयाबहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करता!

गुरूदेव नम्रमुनी महाराज यांना मी भेटले मला गळ्याचा त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितले. मी सातत्याने रोज उठून सतत ओमचा उच्चार करत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, आज माझा गळा चांगला झाला.

मी ती माझी भावना व्यक्त केली. याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचे काम नव्हते. स्वामी समर्थ महाराज, साईबाबांचे आम्ही सर्व भक्त आहोत. आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतो, असे स्पष्टीकरण देत जैन मुनींच्या आशीर्वादाने घसा दुरुस्त झाल्याचा दावा महापौरांनी कायम ठेवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT