

MHADA lottery flat cost Mumbai
मुंबई: अर्जदाराचे उत्पन्न आणि घराची किंमत यांचा जराही मेळ न बसल्याने म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या ग्राहकांची निराशा होते आहे. 2024च्या सोडती दरम्यान म्हाडाने 370 घरांच्या किंमतींमध्ये 10 ते 25 टक्क्यांची कपात केली होती. यंदाही अशाचप्रकारे घरांची किंमत कमी होईल का, याची प्रतीक्षा अर्जदार करत आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ताज्या सतोडतीतही घरांच्या किंमती प्रचंड आहेत. वरळीच्या प्रेरणा सोसायटीतील 4 घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून त्यांची किंमत प्रत्येकी 2 कोटी 8 लाख 67 हजार 185 ते 2 कोटी 9 लाख 72 हजार 432 इतकी आहे. वडाळ्यातील घरे दीड कोटींना आहेत. अल्प उत्पन्न गटाचे उत्पन्न वार्षिक 6 ते 9 लाखांदरम्यान असते. त्यांना ही घरे कशी परवडणार?
2024 सालच्या सोडतीतही अशाच चढ्या दरांमुळे अपेक्षित प्रतिसादही मिळत नव्हता. त्यामुळे अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच म्हाडाने किंमतींमध्ये कपात केली होती. अत्यल्प गटासाठी 25 टक्के, अल्प गटासाठी 20 टक्के, मध्यम गटासाठी 15 टक्के आणि उच्च गटासाठी 10 टक्के कपात करण्यात आली होती. त्यानंत सोडतीला प्रतिसाद काहीसा वाढला; तरीही काही महागडी घरे शिल्लक राहिलीच!
ताज्या सोडतीत सोमवारपासून बुधवारी संध्याकाळी पर्यंत 3 हजार 362 अर्ज दाखल झाले. त्यापैकी केवळ 1 हजार 417 घरांसाठीच अनामत रक्कम भरण्यात आली. अत्यल्प गटासाठी 25 हजार रुपये, अल्प गटासाठी 50 हजार रुपये अशी प्रचंड मोठी अनामत रक्कम भरावी लागत असल्याने अर्जदार फार कमी घरांसाठी अर्ज करू शकत आहेत.