

मुंबई: जागतिक ऑटीझम डेनिमित्त राज्यभर जनजागृतीपर कार्यक्रम होत असताना, सरकारी आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, राज्यात ऑटिझम स्पेक्ट्रम विकारग्रस्त रुग्णांची अधिकृत नोंदच उपलब्ध नसल्याने या विकाराचे खरे चित्र अस्पष्ट राहिले आहे.
महाराष्ट्रात लाखो मुले या आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज असला तरी, शासकीय पातळीवर अचूक आकडेवारी नसल्यामुळे नियोजनात अडथळे निर्माण होत आहेत.
मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत असले तरी ग्रामीण भागात या आजाराबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेक मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. मुंबईसारख्या महानगरात खासगी रुग्णालयांमध्ये बालविकास बाह्यरुग्ण विभाग सुरू असून वाणी उपचार, व्यवसायोपचार आणि वर्तन उपचारासाठी प्रयत्न केले जातात; मात्र सरकारी रुग्णालयांमध्ये या सुविधा अत्यंत मर्यादित आहेत.
समाजात अजूनही ऑटिझमबाबत गैरसमज आणि कलंक असल्याने अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. “योग्य सुविधा नसल्याने खासगी उपचारांवर लाखो रुपये खर्च करावे लागतात,” अशी प्रतिक्रिया पालक शंकर कदम यांनी दिली.
दर आठवड्याला सरासरी 8 ते 10 लहान मुलांमध्ये ऑटिझमसंबंधित तक्रारी आढळतात. गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली असून यामागे बदलती जीवनशैली, विशेषतः लहान वयात वाढलेला स्क्रीन टाइम आणि प्रत्यक्ष संवाद कमी होणे, हे कारणीभूत असू शकते. लहान मुलांमध्ये जास्त स्क्रीन टाइममुळे अर्थपूर्ण संवाद कमी होतो आणि त्यांच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे डॉ. अनिश पिल्लई, लीड कन्सल्टंट निओनॅटोलॉजी व बालरोगतज्ज्ञ,यांनी सांगितले.
डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन संशोधक) म्हणाले, “ऑटिझम असलेल्या प्रत्येक मुलामध्ये प्रगतीची क्षमता असते. योग्य वेळी निदान, सातत्यपूर्ण उपचार आणि पालकांचा संयमी व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे मुलांच्या विकासात मोठा बदल घडू शकतो. त्यामुळे तुलना न करता प्रत्येक छोट्या प्रगतीचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे.”
ऑटिझमबाबत वाढती प्रकरणे आणि अपुऱ्या सुविधा लक्षात घेता, शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे डॉ. आकाश छेडा, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. सायली बिडकर, सल्लागार बाल न्यूरोलॉजी, कोकीळाबेन अंबानी रुग्णालय यांनी सांगितले.
लक्षणे कधी दिसतात?
साधारण 2 ते 3 वर्षांच्या वयात
काही प्रकरणांत त्याआधीही संकेत दिसू शकतात
कारणे
नेमके कारण निश्चित नाही
अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत असू शकतात
उपचार:
ऑटिझम पूर्णपणे बरा होत नाही, पण योग्य उपचारांनी सुधारणा शक्य:
वाणी उपचार ( सपीच थेरपी)
व्यवसायोपचार ( ऑक्युपेशनल थेरपी )
वर्तन उपचार (बिहेविअर थेरपी)
ऑटिझम स्पेक्ट्रम विकार
ऑटिझम स्पेक्ट्रम विकार हा मेंदूच्या विकासाशी संबंधित विकार आहे. याचा परिणाम व्यक्तीच्या संवाद कौशल्य, सामाजिक वर्तन आणि शिकण्याच्या पद्धतीवर होतो. “स्पेक्ट्रम” म्हणजे प्रत्येक व्यक्तीत याची लक्षणे वेगवेगळी आणि वेगवेगळ्या तीव्रतेची असतात.
अशी घ्या काळजी
समाजाने ऑटिझम असलेल्या मुलांकडे दयेच्या भावनेने पाहण्याऐवजी त्यांना समजून घ्या.
सार्वजनिक ठिकाणी या मुलांचे वेगळे पाहून त्याबाबत त्यांच्या पालकांना दोष देऊ नका.
त्यांच्या पालकांना त्याबाबत दोषी ठरवण्याऐवजी त्यांना यावेळी मदत करण्याचा प्रयत्न करा.
शाळांमध्ये, सोसायटीमध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या मुलांना सामावून घ्या. या मुलांना सामान्य मुलांशी तुलना करत वेगळे पाडू नका.
या मुलांमध्ये काही विशेष कौशल्ये, कलागुण असतात आणि त्यांना नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी योग्य संधी द्या.
इतर लक्षणे
बोलण्यात उशीर किंवा वेगळ्या पद्धतीने संवाद
नजरेला नजर टाळणे
इतरांशी संवाद साधण्यात अडचण
एकाच गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती (सवयीचे वर्तन)
विशिष्ट गोष्टींमध्ये जास्त रस