तासगाव : पुढारी वृत्तसेवा : कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत एकाकी लढत देत राष्ट्रवादीला स्पष्ट बहूमत मिळवून देणारे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांची दखल आता राज्य पातळीवर घेतली गेली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकाविण्यात आला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) शुभेच्छा देत कार्यक्रमाला संबोधित केले. प्रजासत्ताक अधिक कणखर व्हावे ही अपेक्षा आहे. आपल्या कृतीतून आणि कर्तृत्वाने आपण नक्कीच घडवून आणू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीचा सामना करत असताना शेती, उद्योग,व्यापार अशा सर्वच क्षेत्रांसमोर अनेक संकटे उभी राहिली आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ज्या लोकांनी योगदान दिले, देश उभारणीसाठी ज्या व्यक्तींनी प्राणांचे बलिदान दिले अशा सर्वांचे गृहमंत्र्यांनी स्मरण केले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारत देशाला संविधान दिले. संविधानाच्या माध्यमातून भारत देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न होतो. असा प्रयत्न गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात राज्यातील आरोग्य सेवेच्या माध्यमातून होत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा बहुमान मला देण्यात आला. त्याबद्दल मी सर्वांचा ॠणी आहे. अशी भावना यावेळी रोहित पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे – पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, आमदार विद्या चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, मुंबई विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे आदी उपस्थित होते.
हे ही वाचलं का