Shiv Sena Internal Politics
पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकीय क्षेत्रात उधाण आले असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी एक गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फुटीच्या आधीच्या शिवसेनेच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत ह्स्तक्षेप होता, असा दावा त्यांनी आज (दि.१५) पत्रकारांशी बोलताना केला.
ते पुढे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेत परत घेण्यास रश्मी ठाकरे यांनी आडकाठी केली होती. तसेच २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यातही रश्मी ठाकरे यांनी हस्तक्षेप केला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.
मविआचे सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार, असे शिवसेनेच्या सर्व आमदारांना वाटत होते. पण त्यांना मुख्यमंत्री पद देण्यास आडकाठी करण्यात आली. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाहिनी पण आहेत. त्या कधी कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करतात का? त्यांना हस्तक्षेप करताना कोणी पाहिलंय का? असा टोलाही त्यांनी नाव न घेता रश्मी ठाकरे यांना लगावला. शिवसेनेत जो उठाव झाला, तो रश्मी ठाकरेंमुळेच झाला आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आता प्रत्येकजण आपआपल्या परीने काहीही सांगत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली. त्यावरून माझे 100 टक्के घोटाळे बाहेर काढावेत. जर त्यांनी घोटाळे काढले. तर आताच सांगतो मी मंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा देणार. भारतशेठ नी स्वतः काय केलंय हे त्यांनी सांगावे. मंत्री पदाचा आणि आमदारपदाचाही राजीनामा देण्यास मी तयार आहे. आणि जर घोटाळा झाला नसेल, तर राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे हे त्यांच्या तोंडाला काळं फासून घेणार का ? असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, एका स्त्रीचा लाडकी बहिण म्हणून सन्मान करता, आता त्याच स्त्रींना नाव ठेवता का? तर ती ठाकरेंच्या घरची सून आहे म्हणून टीका करता का ? चार वेळा निवडून आलात, ज्या घरात उठबस करत होता, तेव्हा हे आठवले नाही का?, असा पलटवार ठाकरे शिवसेनेच्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गोगावले यांच्यावर केला आहे.