Mumbai Zoo News Pudahri
मुंबई

Mumbai Zoo News: राणीच्या बागेतील माॅर्निंग वाॅक बंद; ज्येष्ठ नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबागेत) गेल्या अनेक दशकांपासून सकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांची वाट प्रशासनाने अडवली आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे कारण पुढे करत प्रशासनाने नवीन 'मॉर्निंग वॉक' पास देण्यासह जुन्या पासचे नूतनीकरण पूर्णपणे बंद केले आहे.

प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, हा अन्यायकारक निर्णय मागे न घेतल्यास थेट राणीबागेच्या वेशीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

​उद्यान प्रशासनाने जारी केलेल्या नव्या सूचनेनुसार, आता सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तिहेरी कमानीच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्राणिसंग्रहालयामध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

त्यांना प्रवेश केवळ प्लाझा परिसरापुरताच मर्यादीत केला असून, पुढे जाण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात फिरण्याची वर्षांनुवर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

​याप्रकरणी प्रशासनाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या कलम ७ (अ)(१) अंतर्गत २ (ज) या नियमाचा दाखला दिला असला, तरी नागरिक मात्र आक्रमक झाले आहेत.

घोडपदेव व राणीबाग प्रभातफेरी समूहाचे प्रमुख अशोक भेके यांनी, "अनेक वर्षांपासून सुरू असलेला मॉर्निंग वॉक अचानक बंद करून प्रशासन कुणाला पाठीशी घालत आहे? लेखी आदेश नसताना ही दडपशाही का?" असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारच्या 'फिट इंडिया' अभियानाचा दाखला देत मनसे नेते संजय नाईक, समाजसेवक दिनेश कोलते आणि प्रभातफेरी समूहाने राणीबाग उद्यान अधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांची भेट घेऊन निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती.

मात्र, प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आता नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर रितू तावडे यांच्याकडे धाव घेतली आहे. प्रशासनाने तात्काळ हा निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT