मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी केली आहे.
गोरेगाव येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. कदम म्हणाले, राज्यातील शेतकरी आणि गोरगरीब जनतेच्या सदैव पाठीशी असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. उलट जरांगे तुमच्याकडे महागड्या गाड्या आणि पैसा कुठून आला, असा सवालही कदम यांनी केला.
एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत. त्यांच्याविषयी असा आरोप कराल तर मराठा समाज सहन करणार नाही. आम्ही तुमच्यासारखे लाचार नाही. स्वतःला आवरा अन्यथा गाठ मराठा समाज आणि शिवसेनेची आहे, असा इशाराही कदम यांनी दिला.
कदम यांनी आपल्या खास शैलीतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होऊ दिले नसते. इतकेच नाही तर त्यांनी उद्धव यांना काँग्रेस सोबतही जाऊ दिले नसते.
आता हेच उद्धव ठाकरे आमची शिवसेना खरी असल्याचा दावा करत आहेत. पण त्यांच्या मागे कोणीही नाही. शोले चित्रपटातील असरानीप्रमाणे आधे इधर आधे उधर अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे. शिवसेनेच्या या अवस्थेला संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोपही कदम यांनी केला.
मागील विधानसभा निवडणूक तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली असता, महायुतीचे २३२ आमदार निवडून आले. आता शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ताकद लावल्यास पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील, असा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करताच, उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.