मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राज्यसभेच्या सातपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी सातवी जागा विरोधकांना मिळेल, ती कोणी घ्यायची हा निर्णय ते करतील, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले आहे.
राजधानी नवी दिल्लीत ‘एआय समिट’नंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकांवर भाष्य केले. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असून सातपैकी सहा उमेदवारांचा विजय पक्का आहे. उर्वरित एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते; मात्र ती जागा कोणाला द्यायची हे त्यांनी ठरवायचे आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्यसभा निवडणुकांसाठीच्या राजकीय समीकरणांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मागील काही निवडणुकांचा इतिहास पाहता संख्याबळ नसतानाही भाजपने अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्याची किमया केली आहे. त्यामुळे एका जागेसाठी महाविकास आघाडीत सहमती न घडल्यास महायुतीकडून काही वेगळी खेळी होणार का, अशा शक्यता वर्तविल्या जात आहेत.
‘एआय’वरील विरोधकांची भूमिका देशहिताची नाही. एआय समिट म्हणजे प्रसिद्धीसाठीचा तमाशा असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एखादी घटना घडल्यानंतर तीच पकडून बसायचे आणि देशाला बदनाम करायची काँग्रेस आणि विरोधकांची प्रवृत्ती देशहिताची नाही. एआय समिटच्या निमित्ताने जगभरातील दिग्गज मंडळी भारतात आली. तसेच एआयच्या क्षेत्रात भारताच्या योगदानाचे कौतुक करत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
जेव्हा मानवी बुद्धिमत्ता कमी पडते तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता सहायक ठरू शकते. त्यामुळे राहुल गांधी यांनी एआयचा चांगला वापर करून घ्यावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला.