मुंबई : मूळ शिवसेनेपासून विभक्त होऊन महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना करणारे राज ठाकरे यांनी रविवारी वचननामा प्रसिद्ध करण्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवले. शिवसेना भवनात येताच राज ठाकरे यांना जुन्या आठवणी दाटून आल्या.
राज ठाकरे म्हणाले, आज मी खूप वर्षांनंतर शिवसेना भवनमध्ये आलो आहे. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदा बघत आहे. माझ्या मनात कायमच्या कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या शिवसेना भवनातील आहेत. त्यामुळे कुठे काय होतं हेच मला आता समजत नाही आहे, पण जुन्या शिवसेना भवनामधील आठवणी या खूप आनंददायी होत्या. त्या आठवणींबद्दल जर मी बोलायला बसलो तर मला पूर्वीपासूनच्या खूप गोष्टी सांगता येतील.
1977 साली शिवसेना भवन झाले आणि त्याच वर्षी जनता पक्षाचे सरकार आले होते. त्यावेळी त्यांची सभा झाल्यानंतर शिवसेना भवनावर दगडफेक झाली होती. त्याला उत्तर देताना शिवसैनिकांनी ट्यूबलाईट काढून फेकल्या होत्या. तेव्हापासूनच्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. पण आता त्या आठवणींमध्ये आज रमत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी, राज ठाकरे हे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. संजय राऊत यांनी मी 20 वर्षांनी आल्याचा उल्लेख केला. ते ऐकून मला मी 20 वर्षांनी जेलमधून सुटून आल्यासारखे वाटत आहे, असे राज ठाकरे म्हणताच पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
मुंबई : पत्रकारांनी विचारलेल्या प्र्रश्नांना राज ठाकरेंनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
(छाया ः दीपक साळवी)