‘शिवतीर्था‌’वरील संयुक्त सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे.  Pudhari photo
मुंबई

Raj Thackeray | मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, आता चुकाल तर सर्वच मुकाल : राज ठाकरेंचा हल्लाबोल

गौतम अदाणींच्या 2014 नंतरच्‍या देशातील प्रकल्पांची दाखवली यादी , मुंबई गुजरातला न्यायचा लाँग टर्म प्लॅन

पुढारी वृत्तसेवा

raj thackeray uddhav thackeray bmc election joint rally

मुंबई : गुजराताला जोडण्याचे दीर्घकालीन नियोजन सुरू आहे. मात्र महापालिका आपल्या ताब्यात असेल तर ते काहीही करू शकत नाहीत. महापालिका आपल्या ताब्यात असेल तर ते अदानीला जमीन देऊ शकत नाहीत, असा दावाही राज ठाकरे यांनी केला. तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जातोय. तुमची जमीन आणि भाषा संपली की तुम्ही संपलात. हेच त्यांना संपवायचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीही असेच संकट होते. आता ते संकट तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे, तुम्हाला कधी बाहेर काढतील हे कळणारही नाही. अशा परिस्थितीत ही निवडणूक होत आहे. आता ही शेवटची संधी आहे. आता चुकला तर सर्वच गमावाल. मराठी माणसांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एक व्हावे, असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि. ११) मुंबईतील शिवाजी पार्कवरुन केले. यावेळी गौतम अदाणींच्या 2014 नंतरच्‍या देशातील प्रकल्पांची यादी दाखवत, त्‍यांनी केंद्र सरकारसह राज्‍य सरकारवर हल्‍लाबोल केला.

मुंबईवर संकट आल्याने आम्ही दोघे एकत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांच्‍या ‘शिवतीर्था‌’वरील संयुक्त सभेत बोलताना राज ठाकरे म्‍हणाले की, मी आणि उद्धव ठाकरे एकत्र आलो याचे कारण म्हणजे मुंबईवर आलेले संकट होते. हिंदी सक्तीविरोधात आम्ही एकत्र आलो. कोणत्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हाच आम्ही एकत्र येण्याचा मूळ विचार होता, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. पुन्हा एकदा मुंबई आणि मराठी माणसांसाठी आम्ही दोन भावांनी उभारलेला लढा बाळासाहेब ठाकरे वरून पाहत असतील, असे म्हणत राज ठाकरे भावूक झाले. मी २० वर्षांनंतर प्रथमच कोणत्या तरी पक्षाबरोबर युती करत आहे. मात्र युती केल्यानंतर अनेकजण नाराज झाले. त्यांना दुखावणे आमचा हेतू नव्हता. ते नाराज झाले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.

एवढी हिंमत येथे कोठून?

२०२४ विधानसभा निवडणुकीनंतर सरकार वाटेल ते निर्णय घेऊ लागले. काँग्रेसही सत्तेत होती, पण तेव्हा सरकार जनतेला घाबरायचे. आता पैसे फेकल्यावर आम्ही सर्वांना विकत घेऊ, अशी हिंमत सरकारमध्ये कशी आली, असा सवालही त्यांनी केला. ६६ उमेदवारांना बिनविरोध करून मतदारांचा हक्क हिरावला. बलात्काराचा आरोप असलेल्या माणसाला भाजपने नगरसेवक केले, तुळजापूरमध्ये ड्रग्स विकणाऱ्याला उमेदवारी दिली. ही हिंमत कोठून आली? वेड्या-वाकड्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यावर असा माज येतो. अख्खी मुंबई विकायला काढली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकार केवळ अदानींवर मेहरबान कसे?

२०२४ लोकसभा निवडणुकीनंतर मला एक व्यक्ती भेटली. त्याने मला माहिती दिली की, ते आज मी तुम्हाला येथे दाखविणार आहे. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला भीती न वाटली तर या देशात निवडणुका न लढलेल्याच बऱ्या. २०१४ मधील भारताचा नकाशा दाखवत राज ठाकरे म्हणाले की, अदानी मोदी पंतप्रधान होण्याआधी कोठे होते, आता ते कोठे आहेत, याचा नकाशाच राज ठाकरेंनी सादर केला. या देशात अनेक उद्योगपती असताना केवळ अदानी यांच्यावर दहा वर्षांत एवढी मेहरबानी कशी होते? एकाच माणसाला सर्व सवलती कशा मिळतात?, असे सवाल त्‍यांनी केले.

देशातील सगळी विमानतळे आणि बंदरे अदानी यांच्या ताब्यात

गौतम अदाणींच्या 2014 नंतरच्‍या देशातील प्रकल्पांची दाखवली यादी दाखवत राज ठाकरे म्‍हणाले की, अदानी सिमेंट उद्योगात कधीच नव्हते. आज देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक कंपनी ही अदानी यांची आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. २०१४ मध्ये अदानी यांचे महाराष्ट्रात केवळ एकच उद्योग प्रकल्प होता. आज महाराष्ट्रात अदानी यांचे उद्योगांचे जाळे पसरले आहे. यावेळी त्यांनी २०१८ ते २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात अदानी यांना कोणते प्रकल्प मिळाले, याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली. तसेच मुंबई विमानतळाची जागा विकण्याचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुंबई गुजरातला न्यायचा लाँग टर्म प्लॅन

मुंबई विकत घेता येत नाही, तर पैसे टाकून जमीन विकत घेत आहेत.वाढवण बंदराला लागून लगेच गुजरात आहे. मुंबई गुजरातला न्यायची याचा मुंबई गुजरातला न्यायचा लाँग टर्म प्लॅनआहे. त्यासाठी आधी पालघर ताब्यात घेतलं जातंय. वाढवण ताब्यात घेतलं जातंय. नंतर ते मुंबईपर्यंत पोहोचणार आहेत. हे सर्व मुंबईला कसं जोडलं जाईल याचा दीर्घकाळपासून नियोजन सुरु आहे. आम्ही बेसावध आहोत. आपल्यात जाती जातीत भांडणं लावले जात आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

आज भुजबळ-फडणवीस एकाच मंत्रीमंडळात

आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. आता ज्यांनी छगन भुजबळ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात घातले तेच भुजबळ आणि फडणवीस एका सरकारमध्ये आहेत. अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांचे पुरावे बैलगाडीभर होते, असा दावा केला होता. आता ते पुरावे न्यायालयात का देत नाहीत, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

भाषा लादणार असाल तर लाथ बसेल

मराठी माणसं एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला मुंबईत एकटे पाडण्याचा डाव आहे. आम्ही एकटे असलो तरी तुमच्यासाठी पुरेसे आहोत. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र तुम्ही आमच्यावर भाषा लादणार असाल तर लाथ बसेल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT