Raj-Uddhav Thackeray Alliance file photo
मुंबई

Raj-Uddhav Thackeray Alliance: मोठी बातमी! उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार; जागावाटपाबाबत काय ठरलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार आहेत.

मोहन कारंडे

मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा होणार असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येऊन युतीची घोषणा करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २३) याबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांतील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जागावाटप अद्याप अंतिम झाले नसले तरी बुधवारी (दि. २४) दुपारी १२ वाजता युतीची घोषणा होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला १०० पेक्षा अधिक जागा, मनसेला ६० ते ७० जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता आहे. मराठी बहुल भागातील ५० टक्के जागांवर शिवसेना आणि ५० टक्के जागांवर मनसे लढेल, असे नियोजन आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधुंची युती झालेलीच आहे. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली असून कोणताही संभ्रम नाही. फक्त घोषणा करायचा विषय आहे, असे राऊत यांनी तत्पुर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. "मुंबई आणि इतर पालिकेत कार्यकर्त्यांकडून सोबत काम करायला सुरुवात झाली आहे, तशा सूचना दिल्या आहेत. युती झाली आहे, फक्त जागावाटवपाबाबत काल रात्री शेवटची भेट झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन घोषणा करतील. नाशिकमध्ये चर्चा आटोपली आहे. पुणे, ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जागावाटप झाले आहे," असेही राऊत यांनी सांगितले.

महायुतीचेही जागावाटप अंतिम टप्प्यात

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांतील महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले असून मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीतील युतीच्या अभूतपूर्व यशानंतर महानगरपालिकांना सामोरे जाण्यासाठी एकदिलाने काम करू. नागरिकांना महाराष्ट्र बदलतो आहे, प्रगतिपथावर आहे याची हमी देण्यासाठी जागावाटप चर्चा फार न लांबवता, त्याला फाटे न फोडता एकीचे वातावरण जनतेपर्यंत पोहोचवावे असा निर्णय आज भाजप बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT