मुंबई : मुंबईतील आयआयटी बॉम्बेचे मुंबई केले नाही, हे चांगलेच झाले, हे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे विधान म्हणजे भाजप सरकारच्या मानसिकतेचेच प्रतीक आहे. मुंबईसह संपूर्ण महानगर क्षेत्रच महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केला.
राज म्हणाले की, जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी, महाराष्ट्राशी किंवा गुजरातशी काहीही संबंध नाही. ते जम्मूचे खासदार आहेत. पण भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या मनातले बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
राज म्हणाले, ‘मुंबई’ नको, ‘बॉम्बे’च हवे, या मागे हळूहळू शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. आधी मुंबई, नंतर संपूर्ण एमएमआर गुजरातला जोडला जाणार आहे. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच. तेव्हा मराठी माणसा जागा हो, असे आवाहन राज यांनी केले.
काँग्रेसचेही टीकास्त्र
केंद्रातील भाजप सरकार आणि त्यांचे मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचत आहेत. जितेंद्र सिंह यांचे ‘बॉम्बे’चे समर्थन करणारे वक्तव्य हे त्यांच्या मनात दडलेल्या भावनेचे प्रकटन आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्या लढ्याची आणि बलिदानाची जाणीव भाजपला नाही. मुंबईचे नाव, मुंबईची ओळख आणि मुंबईचे महाराष्ट्राशी नाते हे भाजपला खटकते. मग प्रकल्प गुजरातला हलवणे असो, की आता अशी वक्तव्ये करणे असो, यात एक सातत्य आहे. काँग्रेस पक्ष मुंबईच्या अस्मितेच्या रक्षणासाठी नेहमीच रस्त्यावर उतरला आहे आणि पुन्हा उतरेल, असा इशारा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिला.